आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:06 IST2025-11-23T16:05:02+5:302025-11-23T16:06:07+5:30
जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो - आजतक
जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चित्रपटाप्रमाणे गुन्हेगारांनी एका शाळेच्या संचालिकेची आलिशान कार चोरली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु नाकाबंदी पाहून ते घाबरले. यानंतर त्यातील एक जण कार तिथेच सोडून पळून गेला. त्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड देखील होती. ती नंतर कारमधून बाहेर पडली आणि जंगलात पळून गेली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन परिसरातील सीतारामपुरा परिसरात ही घटना घडली. शाळेच्या संचालिका कारमध्ये बसणार होत्या, तेव्हा अचानक दोन जण समोर आले आणि कारमध्ये बसले. माहिती मिळताच जयपूर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. अनेक ठिकाणी पोलीस पथकं तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेव्हा गुन्हेगारांनी वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु नाकाबंदी तोडण्यात त्यांना यश आलं नाही.
एकाने घाबरून कार थांबवली आणि जंगलात पळून गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक तरुणी सापडली, जी गुन्हेगाराची साथीदार असल्याचं समोर आलं. अटक केलेल्या तरुणीचं नाव नवसीरत कौर असं आहे. जी मुख्य आरोपी लवजीतची गर्लफ्रेंड आहे. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेश गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएससी नर्सिंगची विद्यार्थिनी नवसीरत लवजीत आणि त्याचा साथीदार बमन सिंह यांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाली होती. तपासात असं दिसून आलं की, नवसीरतने घटनेपूर्वी रेकी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवजीत आणि बमन सिंह हे दोन्ही फरार गुन्हेगार पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायदा, एनडीपीएस कायदा आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप आहेत. ते कार चोरण्यासाठी इंदूरला आले होते, परंतु अपयशी ठरल्यानंतर ते जयपूरला परतले आणि तेथे गुन्हा केला. पोलीस आता दोन्ही फरार आरोपींना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवत आहेत. जयपूर शहर तसेच आसपासच्या भागात छापे टाकले जात आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.