चोरांचा कारनामा! ट्रान्सफॉर्मरवरच मारला डल्ला; १० हजार घरांची 'बत्तीगुल', पाणीपुरवठाही बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:42 IST2026-01-01T13:40:06+5:302026-01-01T13:42:35+5:30
रात्री १२ च्या सुमारास चोरांनी २५० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांबं काढून नेलं.

AI फोटो
लखनौमधील एफसीआय (FCI) उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मोहान रोडवरील सलेमपुर पतौरा भागात मध्यरात्री विजेचं मोठं संकट निर्माण झालं. रात्री १२ च्या सुमारास चोरांनी २५० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांबं काढून नेलं. ट्रान्सफॉर्मरचे रिकामे खोके घटनास्थळीच सोडून चोर फरार झाले. या घटनेमुळे उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे १० हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे सकाळी पाणीपुरवठा देखील होऊ शकला नाही. तब्बल १८ तासांनंतर, बुधवारी संध्याकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.
विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमित कुमार आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी सर्वात आधी ११ हजार व्होल्टचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मर चौथऱ्यावरून खाली पाडून त्यातील तांबं चोरलं. या घटनेमुळे विभागाचे अंदाजे ४ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती सकाळी ९ वाजता मिळाली. त्यानंतर संध्याकाळी डॉग स्क्वॉडसह पोलीस तपासासाठी पोहोचले. या संपूर्ण काळात वीजपुरवठा बंदच होता.
तज्ज्ञांच्या मते, ट्रान्सफॉर्मर आणि ओव्हरहेड लाईनचा विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी लोखंडी साखळीचा वापर करतात. साखळी लाईनवर फेकल्यामुळे मोठा स्फोट होतो आणि लाईन 'ट्रिप' होते. तज्ज्ञांनी असा सवालही उपस्थित केला आहे की, जर उपकेंद्रातील ऑपरेटरने लाईन ट्रिप होताच ती पुन्हा सुरू केली असती, तर चोरी रोखणं सोपं झालं असतं.
ऑपरेटर तसं करत नाहीत आणि लाईनमन देखील वेळेवर घटनास्थळी तपासणीसाठी पोहोचत नाहीत. अमौसी झोनचे मुख्य अभियंता महफूज आलम यांनी सांगितलं की, ट्रान्सफॉर्मर पाडून तांब चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. अशा घटना रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक सूचना व उपाययोजना घेतल्या जातील.