बलात्कार पीडिता आत्मदहन: माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 22:08 IST2021-08-27T22:04:53+5:302021-08-27T22:08:39+5:30
Lucknow former IPS amitabh thakur arrested : फेसबुक लाईव्हमध्ये तिने वाराणसीचे तत्कालीन एसएसपी अमित पाठक, तत्कालीन सीओ भेलूपुर अमरेश सिंह बघेल, निरीक्षक संजय राय आणि इतरांवर खासदारांना वाचवण्याचा आणि त्रास देण्याचा आरोप केला होता.

बलात्कार पीडिता आत्मदहन: माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना पोलिसांनी केली अटक
लखनऊ - माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना लखनऊ पोलिसांनी बलात्कार पीडितेला आत्मदहन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. एसआयटीच्या तपासाच्या अहवालाच्या आधारे माजी आयपीएसवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी मंगळवारी तपास समितीने माजी आयपीएस अमिताभ ठाकूर आणि आयपीएस अमित पाठक यांची चौकशी केली होती. या तपास समितीमध्ये डीजी आरके विश्वकर्मा आणि एडीजी मीरा रावत यांचा समावेश आहे. बसपाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीने आपल्या एका साथीदारासह सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहन केले होते. आत्मदहनाच्या अगोदर, फेसबुक लाईव्ह करत असताना, तिने उत्तर प्रदेशच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह इतर काही लोकांना त्रास देण्याचा आणि दबाव आणण्याचा आरोप केला होता. नंतर उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. वास्तविक बलियाची रहिवासी असलेल्या पीडिता वाराणसीतील एका कॉलेजची विद्यार्थिनी होती. फेसबुक लाईव्हमध्ये तिने वाराणसीचे तत्कालीन एसएसपी अमित पाठक, तत्कालीन सीओ भेलूपुर अमरेश सिंह बघेल, निरीक्षक संजय राय आणि इतरांवर खासदारांना वाचवण्याचा आणि त्रास देण्याचा आरोप केला होता.
अमिताभ ठाकूर कोण आहेत?
१९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर हे मूळचे बिहारचे आहेत. त्यांची कारकीर्द अनेक वादांनी घेरली गेली. ते अनेक जिल्ह्यात एसपी होते. अमिताभ ठाकूर हे राष्ट्रीय माहिती अधिकार फोरमचे संस्थापकही राहिले आहेत. त्याची पत्नी देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. २०१५ मध्ये अमिताभ ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. सेवेत असताना ते सरकारविरोधात आवाज उठवत राहिले. त्याच वर्षी त्यांना जबरदस्तीने निवृत्त करण्यात आले. काही दिवसांनी अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.