लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:07 IST2025-11-28T12:04:40+5:302025-11-28T12:07:59+5:30
live in partner murder Delhi: लिव्ह इन पार्टनरची हत्या करून त्याने मृतदेह कारमध्ये आणून ठेवला. पण, गुन्हा लपवण्यासाठी जे करायला निघाला होता, ते करताच आले नाही. सगळं घडलं दारूमुळे...

लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
Live in Partner Murder Delhi Crime: एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची गळा दाबून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्रांची मदत घेतली. तो कारमध्ये नेऊन ठेवला. मात्र हा व्यक्ती इतका दारू प्यायलेला होता की, त्याला कार चालवणे अशक्य झाले आणि त्याने मृतदेह कारमध्ये तसाच ठेवला. रात्री घरात जाऊन झोपला. सकाळी हे प्रकरण उघडकीस आले आणि खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंग (वय ३५) असे लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
शेजाऱ्याचा पोलिसांना कॉल
दुसऱ्या दिवशी सकाळी वीरेंद्र सिंगचा शेजारी घराबाहेर आला. त्याला कारमध्ये महिला झोपलेली दिसली. वीरेंद्र सिंग आणि महिला विवाहित असावेत, असा त्याचा अंदाज होता. पण, महिला स्वीफ्ट कारमध्ये झोपलेल्या दिसल्यानंतर त्याने पोलिसांना कॉल केला आणि याची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी कारमधील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेचा मृतदेह कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेला होता. महिलेच्या शरीरावर जखमा होत्या आणि चेहऱ्यावर ओरखडे होते.
विवाहित वीरेंद्र दोन वर्षांपासून राहत होता महिलेसोबत
वीरेंद्र हा नजफगढचा रहिवाशी आहे. तो आणि मयत महिला मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. वीरेंद्र विवाहित आहे आणि त्याला मुलेही आहेत.
महिलेचे घर विकून स्वतःच्या नावावर घेतले घर
मयत महिलेचे पूर्वी पालम भागात घर होते. ते त्यांनी विकले. त्या पैशातून वीरेंद्रने गेल्या ऑगस्ट महिन्यात छावला येथे स्वतःच्या नावाने तीन मजली इमारत खरेदी केली.
महिलेच्या घराच्या विक्रीतून आलेल्या पैशांपैकी उरलेले २१ लाख रुपये वीरेंद्रकडेच होते. त्यावरून दोघांमध्ये वाद होत असत. २५ नोव्हेंबरच्या रात्री त्या दोघांनी मद्यपान केले व त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. २१ लाख रुपये देण्यावरूनच त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या वेळी वीरेंद्रने महिलेची हाताने गळा दाबून हत्या केली.
मृतदेहाची विल्हेवाट लावणे शक्य झाले नाही
लिव्ह-इन-पार्टनरची हत्या केल्यानंतर वीरेंद्रने दोन मित्रांना बोलावून तिचा मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर हे मित्र निघून गेले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वीरेंद्रने गाडी चालविण्याचा प्रयत्न केला. पण अतिशय मद्यधुंद असल्याने त्याला ते जमले नाही.
मृतदेह कारमध्ये तसाच ठेवून तो घरी परतला. पुन्हा मद्यप्राशन केले व झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्याने गाडीतील मृतदेह पाहून पोलिसांना त्याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घरात झोपलेल्या वीरेंद्रला अटक केली तसेच त्याच्या दोन मित्रांचाही शोध घेण्यात येत आहे.