'रील'ची जीवघेणी नशा! वडिलांनी हटकले म्हणून BBA करणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:05 IST2025-11-30T11:04:39+5:302025-11-30T11:05:34+5:30
इंस्टाग्रामवर तासन्तास रील पाहण्याच्या सवयीवरून वडिलांनी हटकले म्हणून १९ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.

'रील'ची जीवघेणी नशा! वडिलांनी हटकले म्हणून BBA करणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
आजकाल सोशल मीडिया रील्सचे वेड तरुणाईसाठी किती जीवघेणे ठरू शकते, याचे भीषण उदाहरण समोर आले आहे. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात इंस्टाग्रामवर तासन्तास रील पाहण्याच्या सवयीवरून वडिलांनी हटकले म्हणून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. क्षणार्धात घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आजच्या आधुनिक काळात मोबाइल आणि त्यावरील मनोरंजनाची साधने केवळ टाईमपास न राहता एक जीवघेणी सवय बनत चालली आहेत. लोकांच्या दैनंदिन जीवनात, अगदी जेवण करतानाही, मोबाइल स्क्रीनमध्ये गुंतून राहण्याची ही नशा कुटुंबातील संबंधांवरही परिणाम करत आहे.
असाच काहीसा प्रकार हिंदूपूर शहरातील सत्यनारायणपेट येथे राहणाऱ्या भानु तेजा या तरुणीच्या बाबतीत घडला. एका खासगी महाविद्यालयात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या भानू तेजाला मोबाइलमध्ये रील पाहण्याचे विलक्षण वेड लागले होते.
अभ्यासाऐवजी दिवसभर स्क्रोलिंग
भानु तेजा अभ्यासासाठी बसली तरी तिच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाइल असायचा. ती सतत रील स्क्रोल करत राहायची. हळूहळू ही सवय इतकी वाढली की, तिचे कुटुंबीय चिंतेत पडले. तिचे वडील तिला वारंवार रील पाहण्यापासून परावृत्त करत होते. शनिवारी भानु तेजाचे वडील तिच्यावर खूप भडकले. त्यांनी तिला अभ्यास करण्यासाठी सांगितले आणि कठोर शब्दांत 'आजपासून रील पाहणे सोडून दे', असे सुनावले.
रागाच्या भरात घेतला टोकाचा निर्णय
वडिलांच्या या ओरडण्यामुळे भानु तेजा प्रचंड संतापली. तिने कोणताही विचार न करता थेट घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीत धाव घेतली आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. थोड्या वेळाने वडिलांनी आणि कुटुंबीयांनी आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने दरवाजा तोडला. आत पाहताच त्यांना धक्का बसला. भानु तेजाने स्वतःच्या साडीचा फास तयार करून फॅनला लटकून आत्महत्या केली होती.
कुटुंबीयांनी तातडीने तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिचे निधन झाले होते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.