Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:13 IST2025-07-02T11:12:52+5:302025-07-02T11:13:39+5:30
Kolkata Case : पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला.

Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणाबाबत आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एका रिपोर्टनुसार, पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारादरम्यान तिला पॅनिक अटॅक आला होता. त्यामुळे तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मुख्य आरोपी मनोजीतने त्याचा साथीदार जैब अहमदला इनहेलर आणण्यास सांगितलं आणि त्याने पीडितेला इनहेलर दिला. पीडितेच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने न्यायालयात खुलासा केला की, आरोपीने पीडितेची प्रकृती सुधारल्यावर तिच्यावर आणखी अत्याचार करण्याचा प्लॅन केला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी
रिपोर्टनुसार, कोलकाता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे ज्यामध्ये आरोपी जैब मेडिकल स्टोअरमधून इनहेलर खरेदी करताना दिसत आहे. मेडिकल स्टोअरच्या मालकाने देखील पुष्टी केली आहे की, आरोपीने ३५० रुपये देखील दिले होते.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात अटक केलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. या तिघांमध्ये मुख्य संशयित मनोजीत मिश्रा आणि इतर दोन विद्यार्थी - जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांचा समावेश आहे. मिश्रा हा लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि कर्मचारी होता. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी कॉलेजमध्ये घडली. या तिघांना अटक करण्यात आली आहे.