"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:14 IST2025-07-24T17:12:02+5:302025-07-24T17:14:15+5:30
कर्नाटक हायकोर्टाने तीन मुस्लिम तरुणांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला.

"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा
Karnataka HC:मंदिराजवळ पत्रके वाटून इस्लामचा प्रचार केल्याचा आरोप असलेल्या तीन जणांविरुद्ध कर्नाटक हायकोर्टाने दाखल केलेला एफआयआर रद्द केला. मुस्लिमांनी मंदिरात इस्लामचा प्रचार करण्यासाठी पत्रके वाटणे, अल्लाहची स्तुती करणं आणि त्यांच्या धर्माबद्दल बोलणं पत्रके वाटणे हा गुन्हा नाही, असं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं. जुन्या मंदिरात इस्लामचा प्रचार केल्याबद्दल या मुस्लिमांना अटक करण्यात आली होती. राज्याच्या धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्नाटक हायकोर्टाने हिंदू मंदिरात इस्लामच्या शिकवणींचा प्रचार करणारे आणि त्यांच्या धार्मिक शिक्षेसंदर्भाती पत्रके वाटल्याचा आरोप असलेल्या तीन मुस्लिम व्यक्तींविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी मंदिराच्या आत पत्रके वाटणाऱ्या मुस्लिमांना जामीन मंजूर केला. केवळ मंदिरात इस्लामचा प्रचार करणारे आणि त्याचे स्पष्टीकरण देणारे पत्रके वाटणे हा गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत धर्मांतराचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असं कोर्टाने म्हटलं. या प्रकरणात धर्मांतराचे बळी ठरलेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्यांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचेही कोर्टाने म्हटलं.
आरोपींवर भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम २९९, ३५१(२) आणि ३(५) आणि कर्नाटक धर्म स्वातंत्र्य हक्क संरक्षण कायदा, २०२२ च्या कलम ५ अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक टी यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपींनी वरील कायद्यांनुसार कोणताही गुन्हा केलेला नाही कारण त्यांनी कोणत्याही व्यक्तीला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे तक्रारदाराने आरोप केला होता की, ४ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता, जेव्हा ते जमखंडी येथील रामतीर्थ मंदिरात गेले तेव्हा काही लोक इस्लामिक शिकवणींचा प्रचार करणारे पत्रके वाटत होते आणि मंदिर परिसरात लोकांना त्यांच्या धार्मिक शिक्षा तोंडी समजावून सांगत होते. तिथल्याहिंदू भाविकांनी या प्रकाराबद्दल विचारणा केली असता, मुस्लिम तरुणांनी हिंदू धर्मावर टीका करत अपमानास्पद टिप्पणी केली असं तक्रारीत म्हटलं.
आरोपी मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या बदल्यात दुबईमध्ये गाड्या आणि नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत होते, असंही तक्रारदाराने म्हटलं. दुसरीकडे, दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करत याचिकाकर्त्यांनी आम्ही फक्त अल्लाह किंवा पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणीचा प्रचार करत होतो असं म्हटलं.