२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:52 IST2025-12-30T11:51:25+5:302025-12-30T11:52:35+5:30
विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं.

२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील एका दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ अधिकच गडद होत चाललं आहे. आधी पत्नीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केली, त्यानंतर दोन दिवसांनी पतीने बंगळूरूहून नागपुरात येऊन एका हॉटेलमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. इतकंच नाही तर पतीच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्यातून त्या वाचल्या आहेत. आता या घटनेत एक नवीन माहिती समोर आली आहे.
विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि गानवी यांच्यात हनिमूनदरम्यान लग्नापूर्वीच्या एका नात्यावरून जोरदार भांडण झालं होतं. २९ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं.
हनिमून ट्रिपदरम्यान झाला वाद
'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, श्रीलंकेत असताना गानवी आणि सूरजमध्ये वाद झाला होता. एका नातेवाईकाने असा दावा केला आहे की, गानवीला हे लग्न पुढे टिकवायचं नव्हतं. गानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर बंगळुरूमध्ये सूरजच्या घरासमोर निदर्शने झाली आणि काही लोकांनी घरावर हल्लाही केला. या सर्व प्रकारामुळे सूरज प्रचंड घाबरला होता आणि याच भीतीपोटी तो बंगळुरू सोडून नागपूरला निघून गेला, असा दावा त्याच्या आजोबांनी केला आहे.
कुटुंबीयांनी केला समेट घडवण्याचा प्रयत्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेहून परतल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी सूरज आणि गानवीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. गानवी आपल्या माहेरी परतली आणि काही दिवसांतच तिने टोकाचं पाऊल उचललं. मात्र श्रीलंकेत नक्की कोणत्या 'नात्या'वरून वाद झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सूरज आणि आई प्रचंड घाबरले
सूरजचे आजोबा संजय यांनी हुंड्याची मागणी केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गानवीच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं. घरासमोर झालेली निदर्शनं आणि हल्ल्यामुळे सूरज व त्याची आई प्रचंड घाबरले होते, त्यामुळे त्यांना शहर सोडावं लागलं. सूरजच्या भावानेही असा दावा केला की, सूरजच्या शोधात सुमारे ३० जणांनी त्यांच्या घरावर धाड टाकली होती. यामुळेच सूरजकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.