न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:19 IST2025-10-07T17:10:19+5:302025-10-07T17:19:01+5:30
Judge shot dead News: संपत्तीच्या वाद असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे.

न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
Judge shot dead in court News: संपत्तीचा वाद... प्रकरण न्यायालयात आले. न्यायमूर्ती या प्रकरणावर सुनावणी घेत होते, त्याचवेळी आरोपी बंदूक घेऊन कोर्टात आला आणि त्याने गोळीबार केला. यात न्यायमूर्ती गंभीर जखमी झाले. त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे. या गोळीबारात संपत्तीचा वादातील पिता-पुत्रही जखमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अल्बानियाची राजधानी तिरानामध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी (६ ऑक्टोबर) एका व्यक्तीने थेट न्यायमूर्तींवरच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
न्यायाधीश एस्ट्रिट कलाजांची न्यायालयातच हत्या
पोलिसांनी सांगितले की, न्यायाधीश एस्ट्रिट कलाजा हे आरोपीशी संबंधित संपत्तीच्या वाद प्रकरणाची सुनावणी घेत होते. त्याचवेळी आरोपी एल्विस श्केम्बी याने न्यायालयात येत न्यायाधीशांवर गोळ्या झाडल्या. या अंदाधूंद गोळीबारात न्यायाधीशाबरोबरच या संपत्तीच्या वादातील पक्षकार असलेले मुलगा आणि त्याचे वडिलही जखमी झाले.
न्यायाधीश एस्ट्रीट कलाजा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे सांगितले. जखमी असलेल्या पिता पुत्रालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
न्यायाधीशाची आरोपीने हत्या का केली?
पोलिसांनी सांगितले की, ३० वर्षीय एल्विस श्केम्बी याने गोळीबार केल्यानंतर न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी लगेच पकडले. त्याच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संपत्तीचा वाद होता. तो न्यायालयात गेला. न्यायालयाचा निकाल विरोधात जाणार असल्याची कल्पना एल्विस श्केम्बी याला आली होती. त्याच रागातून त्याने न्यायाधीशावर गोळ्या झाडल्या.