भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:12 IST2025-10-15T09:11:59+5:302025-10-15T09:12:49+5:30
विद्यार्थिनी शाळेत शूजऐवजी चप्पल घालून आली होती. मुख्याध्यापिकेने मारल्यानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनी शाळेत शूजऐवजी चप्पल घालून आली होती. मुख्याध्यापिकेने मारल्यानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी (१४ ऑक्टोबर) उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
१५ सप्टेंबर रोजी दिव्या कुमारी नावाची एक विद्यार्थिनी शूटऐवजी चप्पल घालून शाळेत आली तेव्हा ही भयंकर घटना घडली. मुख्याध्यापिका द्रौपदी मिंज यामुळे खूप संतापल्या. नियमांचा हवाला देत चप्पल शाळेच्या ड्रेस कोडचा भाग नाही असं सांगितलं. त्यानंतर मुुलीने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विद्यार्थिनीला ओरडल्या आणि मारहाण केली.
सुरुवातीला विद्यार्थिनी ठीक दिसत होती, परंतु नंतर ती नैराश्यात गेली. डाल्टनगंज येथील रुग्णालयात उपचारानंतर तिला रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये पाठवण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या पालकांनी बारगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावकऱ्यांनी तिचा मृतदेह ठेवून मुख्य रस्ता रोखला आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी केली.
दिव्याचा मृत्यू झाल्यानंतर मुख्याध्यापिकेला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून उठवण्याचं आवाहन केलं. गावकऱ्यांना दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं. मुख्याध्यापिकेने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.