'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:26 IST2026-01-08T13:22:56+5:302026-01-08T13:26:48+5:30
एका खाजगी मॅरेज गार्डनमध्ये रखवालदाराचे काम करणाऱ्या रामकिशन याच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे.

'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
सोनम रघुवंशीचे प्रकरण आजही लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. मात्र, या घटनेनंतर अशा अनेक घटना समोर आल्या. आता हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातून एक अंगावर शहारे आणणारी अशीच एक घटना समोर आली आहे. एका खाजगी मॅरेज गार्डनमध्ये रखवालदाराचे काम करणाऱ्या रामकिशन याच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. ही हत्या कोणी दुसऱ्या तिसऱ्याने नाही, तर रामकिशनच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या सरिता नावाच्या महिलेने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
अश्लील चित्रपट आणि विकृत छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामकिशन (३९) हा नशेचा आहारी गेला होता. सरिताने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिला अश्लील चित्रपट पाहायला लावून तशाच प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. या विकृत वागणुकीमुळे आणि वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. "मी कंटाळले होते, त्या रात्री मी ठरवलं की आज याचा शेवट करायचाच," असं सरिताने रडत रडत पोलिसांना सांगितलं.
मध्यरात्री प्रियकराची एन्ट्री आणि मृत्यूचा थरार
५ जानेवारीच्या रात्री रामकिशनने नशा करून सरिताला मारहाण केली होती. त्यानंतर तो गाढ झोपेत गेला. याच संधीचा फायदा घेऊन सरिताने आपला प्रियकर सतपाल याला फोन करून बोलावले. सतपाल हा रामकिशनचाच जुना मित्र होता, ज्याची ओळख तुरुंगात झाली होती. सतपाल घरात आल्यावर त्याने रामकिशनच्या छातीवर बसून उशीने त्याचे तोंड दाबले, तर सरिताने पतीच्या गुप्तांगावर जोरात दाब दिला. गुदमरून आणि वेदनेने रामकिशनचा जागीच मृत्यू झाला.
तुरुंगातील मैत्रीनेच केला घात
रामकिशन हा स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल होते. तुरुंगात असतानाच त्याची मैत्री सतपालशी झाली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सतपाल आणि रामकिशनची पत्नी सरिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी आणि पतीच्या जाचातून सुटण्यासाठी या दोघांनी हत्येचा कट रचला.
पोलिसांची कारवाई
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश कुमार यांनी सांगितले की, हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. संशयाची सुई पत्नी सरिताकडे होतीच, चौकशीत तिने सर्व काही कबूल केले आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिचा प्रियकर सतपाल सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.