आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:36 IST2026-01-10T11:35:29+5:302026-01-10T11:36:32+5:30
आरटीओ अधिकाऱ्याच्या सख्ख्या पुतणीने आधी एका आयफोनसाठी घरात चोरी केली, तेव्हा कोणालाच काही समजलं नाही. यामुळे तिचं धाडस वाढलं आणि तिने पुन्हा चोरी केली.

फोटो - आजतक
छत्तीसगडमधील जशपूर येथे हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या सख्ख्या पुतणीने आधी एका आयफोनसाठी घरात चोरी केली, तेव्हा कोणालाच काही समजलं नाही. यामुळे तिचं धाडस वाढलं आणि तिने पुन्हा चोरी केली. चोरीच्या पैशांतून तिने आपल्या बॉयफ्रेंडला २५ लाख रुपयांची आलिशान कार भेट दिली, मोठ्या पार्ट्या केल्या. मात्र जेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला, तेव्हा पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.
जशपूरचे जिल्हा परिवहन अधिकारी विजय निकुंज यांच्या घरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस तपासात समोर आलं की, त्यांची सख्खी पुतणी मीनल निकुंज हिने पहिल्यांदा आयफोन खरेदी करण्यासाठी चोरी केली होती. तिने कपाटातून सुमारे दोन लाख रुपये चोरले. अनेक दिवस उलटूनही पैसे गायब झाल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही, तेव्हा मीनलला वाटले की हे काम सोपं आहे. दुसऱ्यांदा तिने तीन लाख रुपये चोरले. यावेळीही घरात कोणालाच संशय आला नाही. याच विश्वासाचा फायदा घेत मीनलने तिसरी आणि सर्वात मोठी चोरी केली.
सूटकेस गायब आणि ५ कोटींचा डल्ला
तिसऱ्या वेळी मीनलने आपल्या आजीच्या खोलीची चावी चोरली आणि तिथे ठेवलेली संपूर्ण सूटकेस गायब केली. या सूटकेसमध्ये सुमारे १५ लाख रुपये रोख, सोन्याची बिस्किटं आणि मौल्यवान दागिने होते. पोलिसांच्या अंदाजानुसार, या सोन्याची आणि रोख रकमेची एकूण किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. मीनल एकटी नव्हती, या गुन्ह्यात तिचा बॉयफ्रेंड अनिल प्रधान हा देखील तिचा जोडीदार होता. दोघांनी चोरीची ही रक्कम खर्च केली.
२५ लाखांची कार, रिसॉर्ट आणि लक्झरी लाईफ
चोरीच्या पैशातून मीनलने आपल्या बॉयफ्रेंडला २५ लाख रुपयांची कार भेट दिली. इतकंच नाही तर दोघांनी रायपूरमध्ये एक लक्झरी व्हिला बुक करून वाढदिवस साजरा केला, जिथे अवघ्या तीन दिवसांत ५ लाख रुपये खर्च केले. रायपूर आणि दुर्गमधील रिसॉर्ट्स, सहली आणि पार्ट्या सर्वकाही एखाद्या चित्रपटासारखं सुरू होतं. हा ऐशोआराम कायम राहील असं त्यांना वाटलं होतं.
चोरी झाल्याचा रचला बनाव
या घटनेत रंजक वळण तेव्हा आलं जेव्हा आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, जशपूर जवळील 'रानीदाह वॉटरफॉल' येथे पार्टी दरम्यान त्यांच्या भाड्याच्या खोलीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सूटकेस चोरली, ज्यामध्ये सोन्याचे दागिने होते. म्हणजेच ज्यांनी स्वतः चोरी केली होती, त्यांनीच स्वतः वस्तूची चोरी झाल्याचा बनाव रचला. पोलीस सध्या या दाव्याची सत्यता पडताळून पाहत आहेत.
पोलिसांनी केली आरोपींना अटक
जेव्हा आरटीओ अधिकारी विजय निकुंज यांना घरातून सोनं आणि रोकड गायब झाल्याचे समजले, तेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. जशपुरचे पोलीस अधीक्षक शशी मोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे मीनल आणि तिच्या साथीदारांना रांची येथील एका हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत ५१.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कार, सोन्याची तीन बिस्किटं, ८६ हजार रुपये रोख, तीन मंगळसूत्र आणि एक आयफोन यांचा समावेश आहे.