लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:38 AM2020-09-03T01:38:54+5:302020-09-03T01:39:15+5:30

कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते.

Increased incidence of vehicle theft in lockdown, rise of thieves in welfare zone | लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद

लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद

Next

- प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत घरफोडी, चोरी, हाणामारी, सोनसाखळीचोरी, दुचाकीचोरी, आॅनलाइनद्वारे फसवणूक यासारखे गुन्हे नेहमीच घडतात. मात्र, वाहनचोरी व आॅनलाइनद्वारे फसवणूकवगळता अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लॉकडाऊनच्या काळात कमालीची घट झाली होती. वाहनचोरीचे सत्र लॉकडाऊनप्रमाणे अनलॉकमध्येही सर्रास सुरू आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग व अथवा मानपाडा पोलीस यांनी दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना काही दिवसांपूर्वीच जेरबंद केले आहे.
कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. दरम्यान, मनपा क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सुरू असलेल्या अनलॉक-४ मध्येही ४४ कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम आहे.
लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला लागू झालेली संचारबंदी पाहता त्यावेळेस इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. केवळ संचारबंदीचे उल्लंघन करण्यासंदर्भातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. याचबरोबर वाहनचोरीच्या घटनांचे सत्रही सुरूच होते. गेल्या सहा महिन्यांत ६८ वाहनांची चोरी झाली आहे. यात दुचाकी, रिक्षा आणि मोटारसारख्या वाहनांचाही समावेश आहे. यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके तैनात केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. परंतु, सध्या अनलॉकमध्येही वाहनचोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे.

दुचाकींसह रिक्षा आणि कार चोरीला
कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत येणाºया महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९, बाजारपेठच्या परिक्षेत्रात ११, खडकपाडा हद्दीत ६, तर डोंबिवलीतील रामनगरमध्ये ८, विष्णूनगरमध्ये २, टिळकनगर क्षेत्रात ६, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वाहने चोरीला गेली आहेत. चोरीस गेलेल्या वाहनांमध्ये ५४ दुचाकी, आठ रिक्षा व सहा मोटारींचा समावेश आहे.

... तरीही प्रकार सुरूच


कल्याण : एकीकडे दुचाकीचोरीचे गुन्हे वाढले असताना दुसरीकडे हैदर अक्रम इराणी या दुचाकीचोराला कल्याणच्या अ‍ॅण्टीरॉबरी सेलने अटक केली. तरीही शहरांमध्ये वाहनचारीच्या घटना सुरूच आहेत.
पोलिसांनी हैदरकडून चार लाख १५ हजार रुपये किमतीच्या आठ महागड्या दुचाकी आणि एक मोबाइल हस्तगत केला आहे. तर, त्याच्या चौकशीत एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. हैदर हा सराईत चेनस्नॅचरही असून, त्याच्यावर नाशिक, पुणे, ठाणे येथे १४ जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. तसेच त्याच्याविरोधात शांतीनगर, खडकपाडा, उल्हासनगर, कोळसेवाडी, कल्याण तालुका (टिटवाळा) सह मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यात बाइकचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवली येथील मानपाडा पोलिसांनीही दुचाकी चोरणाºया तिघा अल्पवयीन चोरट्यांना पकडले. या तिघांकडून आठ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सात महागड्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मात्र, ते अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. विशेष म्हणजे, यू-ट्युबवर दुचाकीचोरीचे प्रशिक्षण घेऊन या चोरट्यांनी एक्सो ब्लेड, कटर, फ्यूज, आदी सामान खरेदी केले. चोरलेल्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून फिरणे, मौजमजा करणे, दुचाक्या कमी किमतीत विकण्यासाठी ग्राहकांचा शोध घेणे, असा या चोरट्यांचा नित्यक्रम होता.

Web Title: Increased incidence of vehicle theft in lockdown, rise of thieves in welfare zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.