सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला चोर, २६ घरांत दरोडा; घेतली BMW, १ किलो सोनं, ६ किलो चांदीवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:48 IST2026-02-10T11:47:54+5:302026-02-10T11:48:33+5:30
हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे.

AI फोटो
हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आतापर्यंत किमान २६ घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी आहे. आरोपीला महागड्या आणि आलिशान जीवनशैलीची आवड होती, परंतु नोकरीतून मिळणारा पगार यासाठी पुरेसा नव्हता. याच कारणामुळे त्याने चोरीचा मार्ग पत्करला.
'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त शंकरब्रत बागची यांनी सांगितलं की, आरोपी बंद घरांना लक्ष्य करायचा. तो घरात शिरून पैसे, सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरत असे. चोरीच्या पैशातून त्याने चक्क एक महागडी BMW कारही खरेदी केली होती. आरोपीविरुद्ध विशाखापट्टणमच्या विविध भागात चोरीचे २६ गुन्हे दाखल आहेत.
या चोऱ्यांमध्ये १ किलोपेक्षा जास्त सोनं, ६ किलो चांदी आणि ४० हजार ५०० रुपये रोख चोरीला गेले होते. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ६९९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३.८ किलो चांदीचे दागिने आणि BMW कार जप्त केली आहे. आरोपीने चोरीच्या पैशातून परदेश दौरेही केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी चोरी करण्यापूर्वी आपल्या BMW कारमधून फिरून अशा घरांची रेकी करायचा ज्यांचे मालक बाहेर गावी गेले आहेत. तो हातोडा, कटर आणि स्क्रू ड्रायव्हर सारख्या साध्या साधनांनी कुलूप तोडायचा. आपली ओळख लपवण्यासाठी तो नेहमी मास्क आणि टोपी घालत असे. आरोपीची आणखी एक चलाखी म्हणजे तो एकाच परिसरात वारंवार चोरी करत नसे.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो लांबच्या परिसरात जाऊन घरं फोडायचा. तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड जुना आहे. अल्पवयीन असताना त्याला चार घरांत चोरी केल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं आणि काही काळ बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. त्यानंतर आपल्या मूळ जिल्ह्यात म्हणजेच काकीनाडा येथे अनेक चोऱ्यांच्या प्रकरणात त्याने १४ महिने तुरुंगवासही भोगला आहे. आतापर्यंत एकूण ६२ चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.