अॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:38 IST2025-11-16T14:37:27+5:302025-11-16T14:38:29+5:30
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे

फोटो - ndtv.in
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या पॅलेस वॉर्डमधील सैन मोहल्ला येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अॅसिड फेकलं आणि नंतर तिला छतावरून ढकलून दिलं. गुन्हा केल्यानंतर आरोपी घराच्या वरच्या मजल्यावर लपला. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आरोपी पती नंदलालला शोधून अटक केली.
पत्नी यामध्ये ५०% भाजली आहे, तिला झोनल हॉस्पिटल मंडी येथून एम्स बिलासपूर येथे रेफर करण्यात आलं. ही महिला आणि नंदलाल हे मूळचे धरमपूरचे आहेत, ते बऱ्याच काळापासून मंडीमध्ये राहत आहेत. नंदलाल याचं मंडीमध्ये एक दुकान आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. महिला देखील एका दुकानात काम करते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
शुक्रवारी नंदलाल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. शनिवारी संध्याकाळीही त्यांच्यातील वाद टोकाला गेला. नंदलालने घरात असलेलं अॅसिड त्याच्या पत्नीवर फेकलं आणि तिला छतावरून ढकललं. त्यानंतर तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर लपला. शेजाऱ्यांनी महिलेला मंडी येथील झोनल हॉस्पिटलमध्ये आणलं, जिथे ती ५०% भाजली होती.
घटनेची माहिती मिळताच एएसपी अभिमन्यू वर्मा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितलं की, घरात भांडी स्वच्छ करण्यासाठी अॅसिड ठेवण्यात आले होते. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर तिच्या पतीने अॅसिड फेकलं आणि छतावरून ढकललं.