भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:16 IST2026-01-13T13:15:25+5:302026-01-13T13:16:07+5:30
अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीचे कपडे खेळताना नाल्यात पडल्यामुळे खराब झाले, एवढ्या क्षुल्लक कारणावरून तिच्या सावत्र आईने क्रूरतेचा कळस गाठला.

AI Generated Image
माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना दिल्लीनजीकच्या गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीचे कपडे खेळताना नाल्यात पडल्यामुळे खराब झाले, एवढ्या क्षुल्लक कारणावरून तिच्या सावत्र आईने क्रूरतेचा कळस गाठला. त्या माऊलीने चिमुरडीला खोलीत कोंडून अर्धा तास काठीने इतकी अमानुष मारहाण केली की, त्या निष्पाप जीवाने जागीच प्राण सोडले. या घटनेने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अर्धा तास सुरू होता प्रकार
वेब सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डासना परिसरात ही घटना घडली. निशा नावाच्या महिलेने आपली ६ वर्षांची मुलगी शिफा हिचा जीव घेतला. सोमवारी शिफा बाहेर खेळत असताना अचानक ती जवळच असलेल्या नाल्यात पडली. त्यामुळे तिचे कपडे चिखलाने माखले होते. शिफा घरी येताच निशाचा संताप अनावर झाला. तिने शिफाला खोलीत ओढले, दार लावून घेतले आणि काठीने तिला बेदम मारहाण सुरू केली. चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून आले, त्यांनी दरवाजा उघडायला लावला तेव्हा अंगावर काटा येईल असं दृश्य समोर होतं. शिफाच्या शरीरावर निळे डाग पडले होते आणि तिचे हात-पाय तुटले होते.
आईने कबूल केला गुन्हा
शिफाच्या ओरडण्याने जमलेल्या लोकांनी निशाला पळून जाण्यापूर्वीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अक्रम नावाच्या व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दोन वर्षांपूर्वी निशाशी दुसरे लग्न केले होते. अक्रम मजुरीसाठी बाहेर गेला असताना निशा शिफावर आपला राग काढायची. पोलिसांनी आरोपी निशाला ताब्यात घेतले असून तिने आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. "हो, मीच तिला मारलं," असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
"बाबा, ही मला खूप मारते", लेकीची तक्रार ठरली शेवटची
मृत शिफाचा पिता अक्रमने ढसाढसा रडत सांगितलं की, शिफाने अनेकदा निशाबद्दल तक्रार केली होती. "बाबा, आई मला खूप मारते," असं ती रडत सांगायची. अक्रमने अनेकदा निशाला समजावलं होतं, पण ती सुधारली नाही. अखेर नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि वडिलांच्या गैरहजेरीत त्या लहानग्या कळीला अशा प्रकारे खुडण्यात आलं. या प्रकरणी एसीपी प्रिया श्रीपाल यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल. सध्या सावत्र आईला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.