स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:46 IST2025-11-25T15:44:24+5:302025-11-25T15:46:45+5:30
Violence Against Women: जगभरात मृत्यू झालेल्या ६० टक्के महिलांची हत्या त्यांच्याच जोडीदाराकडून, नातेवाईकांकडून म्हणजे वडील, काका, भाऊ यांच्याकडून केली गेली आहे.

स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
Violence against Women News: आजही महिलांना असे म्हणून घराबाहेर उशिरा फिरण्यास मज्जाव केला जातो की, बाहेर वातावरण सुरक्षित नाही. पण, संयुक्त राष्ट्र संघाच्या एका रिपोर्टने महिला घराबाहेर नाही, तर घरातच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात म्हणजे २०२४ मध्ये प्रत्येक १०व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली गेली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे महिलेची हत्या तिच्याच जवळच्या व्यक्तीकडून केली गेली.
महिलांवरील हिंसाचार निर्मलून दिवसानिमित्त सोमवारी (२४ नोव्हेंबर) रोजी संयुक्त राष्ट संघाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. united nations women ने म्हटले आहे की, "२०२४ मध्ये जवळपास ५० हजार महिला आणि मुलींची त्यांच्याच जवळच्या व्यक्तींनी किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून हत्या केली गेली."
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जगभरात हत्या करण्यात आलेल्या महिलांपैकी ६० टक्के महिलांची हत्या त्यांचा जोडीदार, वडील, आई, काका, भाऊ यांच्याकडून केली गेली. हेच पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर ११ टक्के पुरुषांची हत्या त्यांच्याच जवळच्या व्यक्तींकडून केली गेली.
रिपोर्टमध्ये ११७ देशांमधील महिलांच्या हत्येचे आकडे समाविष्ट करण्यात आले आहेत. ५० हजार हत्यांचा अर्थ दररोज १३७ महिलांची हत्या केली गेली. प्रत्येक दहाव्या मिनिटाला जगात एका महिलेची हत्या केली गेली. २०२३ च्या तुलनेत ही आकडेवारी थोडी कमी आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हत्या प्रकरणामुळे दरवर्षी हजारो महिला आणि मुलींचा जीव जात आहे. पण, यात कोणत्याही सुधारणा होताना दिसत नाही. हत्या होण्याच्या संबंधाने महिला आणि मुलींसाठी त्यांचेच घर सर्वात धोकादायक ठिकाण बनलेले आहे. जगातील कोणतेही क्षेत्र स्त्रियांच्या हत्यांशिवाय राहिलेले नाही.