माथेफिरूचा फिल्मी स्टाईल राडा; गळ्यावर सुरा ठेवून मुलीला ओलीस धरले; पोलिसांच्या धाडसी कारवाईने टळला अनर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:23 IST2026-01-01T13:16:01+5:302026-01-01T13:23:00+5:30
उत्तर प्रदेशात एका माथेफिरुने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला बंधक बनवले होते.

माथेफिरूचा फिल्मी स्टाईल राडा; गळ्यावर सुरा ठेवून मुलीला ओलीस धरले; पोलिसांच्या धाडसी कारवाईने टळला अनर्थ
UP Crime:उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या नजीबाबाद बाजारपेठेत बुधवारी संध्याकाळी एका माथेफिरू तरुणाने एका मुलीलला वेठीस धरलं होतं. एका कपड्याच्या दुकानात शिरून या बुरखाधारी तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर सुरा ठेवून तिला ओलीस धरले. मला पैसे द्या, नाहीतर हिला जीवे मारेन, अशा धमक्या त्याने दिल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या तरुणाला झडप घालून पकडले आणि मुलीची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नजीबाबाद येथील एका कपड्यांच्या सेलमध्ये दोन अल्पवयीन मुली खरेदीसाठी आल्या होत्या. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक एक बुरखाधारी तरुण दुकानात शिरला. काही कळण्याच्या आतच त्याने एका मुलीला पकडले आणि तिच्या गळ्यावर धारदार सुरा ठेवला. या प्रकारामुळे दुकानात पळापळ सुरू झाली. दुकानदारांनी आरडाओरडा केल्यावर बाहेर मोठी गर्दी जमा झाली. गर्दीने तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळ आलात तर मुलीचा गळा चिरीन, अशी धमकी त्याने दिल्याने नागरिक हतबल झाले. काही मिनिटे हा थरार सुरू होता.
पोलिसांची धाडसी कारवाई
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला पोलिसांनी तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर संधी मिळताच पोलिसांनी झडप घालून त्याच्या हातातील सुरा हिसकावून घेतला आणि मुलीला त्याच्या तावडीतून मुक्त केले. या घटनेत मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही.
"बाहेर त्रास होतोय, मला जेलमध्ये पाठवा"
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. आरोपीने आपले नाव अजित असून तो बाराबंकी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे सांगितले. "प्रारंभिक चौकशीत आरोपीने विचित्र कारण दिले आहे. तो म्हणाला की, मला बाहेर खूप त्रास होत आहे, मला शांततेत राहायचे आहे म्हणून मला तुरुंगात जायचे होते. तुरुंगात जाण्यासाठीच मी हे कृत्य केले," असं पोलिसांनी सांगितले.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
आरोपीने मुलीकडे पैशांची मागणीही केली होती, त्यामुळे त्याचा खरा हेतू काय होता? तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे का? आणि तो बाराबंकीवरून नजीबाबादला का आला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.