"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:53 IST2025-08-12T14:52:16+5:302025-08-12T14:53:11+5:30
भाजपा नेत्याच्या मुलाचा आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भाजपा नेत्याच्या मुलाचा आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेत्याच्या मुलाची स्कॉर्पिओ रस्त्यावर उभी असल्याने ट्रॅफिकजॅम झालं होतं. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसाने त्याला कार काढण्यास सांगितलं. पण नेत्याच्या मुलाने गुंडगिरी करत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये मोठा वाद झाला, ज्याचा कॉन्स्टेबलने व्हिडीओ बनवला.
भाजपा नेत्याचं नाव ऋषिपाल सिंह आहे आणि त्याच्या मुलाचं नाव तपेश आहे. तपेश स्कॉर्पिओ गाडी घेऊन बाजारात गेला होता, जिथे त्याचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला. तपेशने त्याची स्कॉर्पिओ रस्त्यावर उभी केली, ज्यामुळे ट्रॅफिकजॅम होत होतं. वाहतूक पोलिसाने गाडी काढून टाकण्यास सांगितलं तेव्हा नेत्याच्या मुलाने अरेरावी करायला सुरुवात केली.
मुलगा तपेशच्या गाडीवर 'एमएलसी' लिहिलेलं होतं आणि बोनेटवर भाजपाचा झेंडाही लावला होता. तपेशने वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन केलं तेव्हा झटापट झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस असं म्हणताना ऐकू येतात की, "तुम्ही रस्ता अडवत आहात आणि त्याहूनही वर तुम्ही गैरवर्तन करत आहात. मी तुमच्यापेक्षा दुप्पट शिकलेलो आहे. मला कसं बोलायचं हे माहित आहे."
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली तेव्हा मी त्याला गाडी हटवण्यास सांगितलं. त्याला अडवताच गाडीतील तरुण रागावला आणि 'चल हट, येथून निघून जा...' असं म्हणाला आणि गाडी हटवण्यास नकार दिला. या प्रकरणावर हाथरसचे एएसपी अशोक कुमार म्हणाले की, व्हायरल व्हिडिओची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि पुढील कारवाई केली जाईल.