Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:02 IST2025-10-18T13:01:38+5:302025-10-18T13:02:23+5:30
Radhika Yadav Murder Case: टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे.

Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
Radhika Yadav Murder Case: गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. २५४ पानांच्या आरोपपत्रात राधिकाचे वडील दीपक यादव हे एकमेव आरोपी आहेत. आरोपपत्रानुसार, दीपक यादवने आत्मसन्मानाला ठेच लागल्याने आपली मुलगी राधिकाची हत्या केली.
पोलीस तपासात असं समोर आलं की, दीपक यादवने आपल्या मुलीवर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्याने कबूल केलं की गावकरी त्याला त्याच्या मुलीच्या कमाईवरून चिडवायचे आणि तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली, दुखावला गेला, म्हणूनच त्याने आपल्या मुलीची हत्या केली.
तपासात असंही समोर आलं की, वडील आणि मुलीमध्ये दीर्घकाळापासून तणाव होता. दीपक अनेकदा राधिकाला बाहेर जाण्यापासून किंवा कोचिंग क्लासेसमध्ये जाण्यापासून रोखत असे, ज्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होत असे. राधिकाच्या वडिलांनी तिला तिचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यास सांगितलं होतं.
या प्रकरणात पोलिसांनी ३५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या जबाबांमध्ये कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि इतर संशयितांकडून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे. राधिका तिच्या अभ्यासात आणि खेळात खूप सक्रिय होती आणि तिला कोचिंग आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जात होते. या घटनेने गुरुग्राममध्ये खळबळ उडाली.
राधिका यादव ही एक प्रतिभावान टेनिस खेळाडू होती जिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आरोपीला अटक केली, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.