मुलीच्या डोक्याला बंदूक, आईने वाचवले प्राण; माझगावमध्ये व्यावसायिकाच्या घरात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:22 IST2025-01-01T14:22:29+5:302025-01-01T14:22:43+5:30
माझगाव येथील जास्मिन अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर राहणारे उमर शम्सी या व्यावसायिकाच्या घरात ही घटना घडली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर होते. शम्सी यांची पत्नी सुमेरा व मुलगी रिदा या घरी होत्या.

मुलीच्या डोक्याला बंदूक, आईने वाचवले प्राण; माझगावमध्ये व्यावसायिकाच्या घरात थरार
मुंबई : माझगाव येथील एका व्यावसायिकाच्या घरात बुरखा घालून फिल्मी स्टाइलने शिरलेल्या लुटारूने १४ वर्षीय मुलीच्या डोक्याला बंदूक लावली आणि घरातील किमती ऐवजाची मागणी केली. या सगळ्या प्रकारात मुलीच्या आईने धाडस दाखवत त्याच्या हातातील बंदूक हिसकावून मुलीची सुटका केली. आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आरोपीला पकडून भायखळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
माझगाव येथील जास्मिन अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर राहणारे उमर शम्सी या व्यावसायिकाच्या घरात ही घटना घडली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर होते. शम्सी यांची पत्नी सुमेरा व मुलगी रिदा या घरी होत्या. त्यावेळी बुरखा खालून एक जण घरात शिरला. त्याने रिदाच्या डोक्याला बंदूक लावून घरातील मौल्यवान दागिने व मोबाइलची मागणी केली.
सुरुवातीला कोणीतरी चेष्टामस्करी करत असल्याचे वाटले. मात्र, घरात एक पुरुष शिरल्याचे समजताच सुमेरा यांनी प्रसंगावधान राखत दागिने दुसऱ्याच्या घरात ठेवल्याचे सांगितले. तसेच दागिने आणून देण्याच्या बहाण्याने त्यांनी त्याच्या हातातील बंदूक हिसकावली आणि आरडाओरडा करताच शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडले.
बुरखा काढला आणि...
आरोपीचा बुरखा काढल्यानंतर तो ११व्या मजल्यावर काम करणारा तौरीकुल शौदुल दलाल (३०) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. व्यावसायिकाला लुटण्यासाठी खेळण्यातील बंदुकीचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले.