रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:53 IST2026-01-12T11:51:37+5:302026-01-12T11:53:20+5:30
एका ८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्याच जन्मदात्यांचा जीव धोक्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका ८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्याच जन्मदात्यांचा जीव धोक्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी दररोज रात्री आई-वडिलांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळायची आणि घरचे गाढ झोपले की आपल्या प्रियकराला भेटायला जायची. मात्र, वडिलांनी रचलेल्या एका सापळ्यामुळे या 'लव्ह स्टोरी'चा भयंकर शेवट झाला आहे.
असा उघड झाला प्रकार
या मुलीचे वडील मुंबईत पेंटिंगचे काम करतात. महिन्याभरापूर्वी ते गावी परतले तेव्हा त्यांना मुलीच्या वागण्यात मोठा बदल जाणवला. ती तासनतास मोबाईलवर कुणाशीतरी बोलायची. विशेष म्हणजे, रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विचित्र ग्लानी यायची आणि सर्वजण अतिशय गाढ झोपायचे. वडिलांना संशय आल्याने त्यांनी पत्नीसोबत मिळून मुलीवर पाळत ठेवण्याचे ठरवले.
वडिलांनी केलं झोपण्याचं नाटक अन्...
३ जानेवारीच्या रात्री मुलीने नेहमीप्रमाणे सर्वांना जेवण वाढलं. मात्र, आई-वडिलांनी ते जेवण न जेवता बाजूला लपवून ठेवलं आणि झोपल्याचं सोंग घेतलं. रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीने सर्वांना झोपलेलं पाहून हळूच शाल पांघरली आणि घराबाहेर पडली. वडिलांनी पाठलाग केला असता, ती २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या घरात शिरल्याचे दिसले. तिथेच वडिलांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
प्रियकरच पुरवायचा औषधं
मुलीची कडक चौकशी केली असता, तिने जे सत्य सांगितलं ते ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. गेल्या एक वर्षापासून ती या तरुणाच्या संपर्कात होती. तो तरुणच तिला झोपेच्या गोळ्या आणून द्यायचा, ज्या ती गुपचूप जेवणात मिसळायची. घरचे बेशुद्ध झाल्यासारखे झोपले की ती प्रियकरासोबत वेळ घालवायची.
धमकी आणि पोलीस कारवाई
या प्रकरणानंतर गावात पंचायतही बोलवण्यात आली होती. मुलाने पुन्हा असं करणार नाही अशी कबुली दिली, पण तो सुधारला नाही. उलट, जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर हतबल झालेल्या वडिलांनी गुलरिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.