गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये २३ तोळे सोने चोरणारी टोळी जेरबंद, रेल्वे पोलिसांची दिल्लीत कारवाई; तिघेजण अद्याप पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:15 IST2025-12-04T16:14:43+5:302025-12-04T16:15:02+5:30
याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने तपास सुरू केला होता

गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये २३ तोळे सोने चोरणारी टोळी जेरबंद, रेल्वे पोलिसांची दिल्लीत कारवाई; तिघेजण अद्याप पसार
मिरज : गांधीधाम–बेंगळुरू एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाची २३ तोळे सोन्याची चोरी हरयाणातील कुख्यात सासी टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी या टोळीचा शोध घेत पाच जणांना दिल्लीत ताब्यात घेऊन अटक केली. तर तिघेजण फरार झाले आहेत. अटक केलेल्या सासी टोळीतील कुलदीप (वय ३४ रा. जिंद), अमित कुमार (३५), मोनू (३२ रा. भिवानी), अजय (३६ रा. जिंद), हवासिंग (६५ रा. जिंद, हरयाणा) या पाचजणांना सात दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
दि. २६ रोजी गांधीधाम एक्स्प्रेसमधून मिरजेत येणाऱ्या महिला प्रवाशाचे सुमारे सव्वाआठ लाख रुपये किमतीचे २३ तोळे सोने चोरट्याने लंपास केले होते. याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. मिरज स्थानकाबाहेर सीसीटीव्ही फुटेजमधून एका संशयिताची ओळख पटली. तो रिक्षातून सांगलीत गेल्याचे समजले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पथक सांगली बसस्थानकावर पोहोचल्यावर तेथे त्याच्यासोबत आणखी सातजण असल्याचे आढळले. तेथून सर्वजण बसने कोल्हापूरला गेले. ही चोरी हरयाणातील सासी टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून या टोळीतील पाच प्रमुख सदस्यांची हालचाल कोल्हापूर व गोवा विमानतळ परिसरात असल्याचे आढळली. दि. ३० रोजी हे संशयित गोवा ते नवी दिल्ली विमानात गेले असल्याची खात्री पटली.
दिल्लीतून हरयाणाला जाण्यासाठी रेल्वे दिल्ली रेल्वे स्थानकात गेले असता रेल्वे पोलिसांनी समन्वय साधत दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने सर्व आरोपींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले. पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सासी टोळीतील कुलदीप, अमित कुमार, मोनू, अजय, हवासिंग या टोळीने गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले सोने घेऊन त्यांचे अन्य तीन साथीदार फरार झाले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध सुरू असून मिरज रेल्वे पोलिस पुढील तपास करत आहेत.
सासी टोळीकडून राज्यात अनेक चोऱ्या
बसस्थानक, रेल्वे स्थानक व रेल्वेच्या परिसरात चोऱ्या करणारी हरयाणातील ही सासी टोळी प्रसिद्ध असून या टोळीने अनेक राज्यांत अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. रेल्वे पोलिसांनी तातडीने शोध घेत या टोळीला पकडले.