Crime News Latest: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये भाजपच्या माजी खासदारावर सशस्त्र जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माजी खासदार एका घरगुती कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ३५-४० जणांनी अचानक माजी खासदारांना घेरलं. शिवीगाळ करत हल्ला केला. पण, कार्यकर्त्यांनी वेळीच त्यांना एका घरात लपवल्याने पुढील अनर्थ टळला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपचे माजी खासदार अक्षयबर लाल गोंड हे रविवारी (४ मे) मोतीपूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मटेही कला गावात गेले होते. भाजपचे कार्यकर्ते राम सरोज पाठक यांच्या घरी धार्मिक पूजा ठेवण्यात आली होती.
माजी खासदार येताच आला जमाव
माजी खासदार अक्षयबर लाल गोंड हे राम सरोज पाठक यांच्या घरी पोहोचले. त्याचवेळी गावातील ३५ ते ४० लोक आले. जमावामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. त्यांनी माजी खासदार अक्षयबर लाल गोंड यांना घेरले.
वाचा >>महिला सेक्स अॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा
हातात लाठ्या काठ्या आणि इतर शस्त्र घेऊन आलेल्या जमावानेअक्षयबर लाल गोंड यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. पण, कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना एका घरात लपवले आणि जमावाच्या हल्ल्यापासून वाचवले.
पोलिसांनी कोणाला केली अटक?
राम सरोज पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोतीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, माजी खासदार घरगुती कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी गावातील शाहीद अली, नियाज, शाहीद अली द्वितीय, नेप्यारे, सन्नो बेगम, आसमा, सबीना, बाबू ऊर्फ सगीर यांच्यासह ३८ लोक लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्र घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.
त्यांनी माजी खासदार अक्षयबर लाल गोंड यांना शिवीगाळ केली. जमावाला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी हल्लाच केला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना एका घरात लपवले. जमावाने त्या घराचा दरवाजा तोंडण्याचाही प्रयत्न केला. ज्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना जमावाने मारहाण केली. त्यामुळे गोंधळ उडाला होता. माजी खासदाराला मारण्याची धमकी देऊन हा जमाव निघून गेला.
या प्रकरणी पोलिसांनी ३० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन महिलांसह १३ जणांना अटक केली आहे.
अक्षयबर लाल गोंडा हे बहराइच लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. २०२४ मध्ये भाजपने त्यांचा मुलगा डॉ. आनंद गोंड यांना उमेदवारी दिली आणि ते खासदार बनले. अक्षयबर लाल गोंड हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत.