भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून गुपचूप भारतात प्रवेश केला. कच्छमधील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा भयंकर प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी या कपलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. कच्छ जिल्ह्यातील खारीर बेट परिसरात ही घटना घडली. रतनपर गावाजवळ भारत-पाकिस्तान सीमा बेकायदेशीरपणे ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी कपलला ताब्यात घेतल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणाने स्वतःची ओळख तोतो उर्फ तारा रणमल भील (१६) अशी करून दिली, तर मुलीचं नाव मीना उर्फ पूजा भील (१५) आहे. दोघेही पाकिस्तानातील थारपारकर जिल्ह्यातील इस्लामकोट येथील लासारी गावचे रहिवासी असल्याचं सांगत आहेत. रतनपर गावच्या जंगलात एका तलावाजवळ लाकूड तोडणाऱ्या मजुरांनी या कपलला संशयास्पद स्थितीत पाहिलं.
गावकऱ्यांच्या सतर्कतेनंतर त्यांनी गावातील प्रमुख लोकांना याबद्दल माहिती दिली. नंतर लगेचच खारीदर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही ताब्यात घेतलं. ही घटना गेल्या आठवड्यातच घडली, जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कच्छला भेट दिली होती. कच्छ पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान या दोघांनी त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असल्याचं सांगितलं. रात्रीच्या वेळी सीमा ओलांडून त्यांनी भारतात प्रवेश केला.
धक्कादायक बाब म्हणजे हे कपल ४० किलोमीटर आत जाण्यात यशस्वी झालं, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झालं आहेत. पोलीस आणि सुरक्षा संस्था या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दोघांनाही संयुक्त चौकशी केंद्रात (JIC) ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे सीमा सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.