"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:03 IST2025-11-20T15:54:25+5:302025-11-20T16:03:52+5:30
एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा हवा असलेल्या एका वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलीला नदीत फेकून दिलं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा हवा असलेल्या एका वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलीला नदीत फेकून दिलं. आता मुलीचा शोध घेतला जात आहेत. आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत असंही म्हटलं की, सुमारे १० महिन्यांपूर्वी मुंबईत राहत असताना वडिलांनी आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
केराकत पोलीस स्टेशन परिसरातील खर्गसेनपुर गावातील रहिवासी अशोक विश्वकर्मा हा तीन मुलींचा बाप आहे. बुधवारी सकाळी अशोक त्याची दीड वर्षाची मुलगी रुतबी हिच्यासोबत सायकलवरून घराबाहेर पडला. त्याने त्याची पत्नी संजूला सांगितलं की, तो रुतबीला फिरायला घेऊन जात आहे. पण अशोकने त्याच्या मुलीला घरापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोमती नदीत फेकून दिलं.
नदीच्या पलीकडे बसलेल्या काही नाविकांनी हे पाहिलं. त्यांनी ओरड केली आणि तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, परंतु जोरदार प्रवाहामुळे ते तसं करू शकले नाहीत. काही वेळातच गावकऱ्यांना याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी वडील अशोकला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली.
अशोकची पत्नी संजू हिने पोलिसांना सांगितलं की, अशोक त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या जन्मापासून तिच्याशी वारंवार भांडत होता. त्याला मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्याने तो नाराज होता. अशोक मुंबईत मजूर म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी आणि तीन मुली गावात राहतात. मोठी मुलगी आकांक्षा १८ वर्षांची आहे आणि दुसरी मुलगी सृष्टी १३ वर्षांची आहे. संजूने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अशोकला अटक केली.