बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:13 IST2026-01-05T15:10:44+5:302026-01-05T15:13:08+5:30
Father Killed Daughter Latest News: वाणिज्य शाखेच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षाच्या लेकीची बापानेच हत्या केली. शेतकरी असलेल्या बापाच्या मनात एका भीतीने घर केले आणि त्याने लेकीलाच संपवले.

बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
Father killed Daughter Crime News: तिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळाले होते. शिकण्याची प्रचंड आवड, त्यामुळे ती पदवीचे शिक्षण घेत होती. पीजीमध्ये राहून बी.कॉमचे शिक्षण घेत असलेल्या चमनप्रीत कौरचा बापच शत्रू ठरला. मनातील भीतीतून बापाने चमनप्रीत कौरची फावड्याने हत्या केली. तिच्या हत्येचे कारण प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. मिड्ढा गावातील हरपाल सिंग असे मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
बापाने मुलीची हत्या का केली?
चमनप्रीत कौर मोहालीमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेत होती. ती पीजीमध्ये राहत होती. हरपाल सिंग हा जुन्या विचारांचा व्यक्ती आहे. त्याच्या मनात ही भीती होती की मुलगी बाहेर शिकायला जाऊन बिघडेल. तिला वाईट सवयी लागतील.
उच्च शिक्षण घेण्यासाठी चमनप्रीत कौरला तिची आई प्रोत्साहित करत होती. तिने शिक्षण घेऊन स्वप्न पूर्ण करावीत अशी आईची इच्छा होती. चमनप्रीतच्या शिक्षणावरूनच आई आणि वडिलांमध्ये वाद होत होते.
रविवारी (४ जानेवारी) सकाळी आरोपी हरपाल सिंगने घरातील फावडे घेतले आणि चमनप्रीत कौरवर हल्ला केला. जबर जखमी होऊन चमनप्रीत कौरचा जागेवरच मृ्त्यू झाला. त्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चमनप्रीत हुशार आणि कष्टाळू होती
गावातील लोकांनी आणि शेजाऱ्यांनी सांगितले की, चमनप्रीत कौर अभ्यासात हुशार होती. ती कष्टाळू होती. शिक्षण घेत असतानाच ती खेळांमध्येही भाग घेत होती. वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला गोल्ड मेडल मिळाले होते.