जळगाव - शनिवारी रात्री कालंका माता चौक परिसरात झालेल्या खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून समोर आले आहे. अजय मंगेश मोरे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने त्याचा आकाश पंडित भावसार याच्याशी वाद झाला होता. यातूनच अजयने अन्य साथीदारांसह आकाशचा खून केल्याची फिर्याद त्याच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौघांना अटक करण्यात आली.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या आकाश भावसार या तरुणाचा शनिवारी (३ मे) रात्री धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मयताची आई कोकिळा भावसार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका महिलेचे व अजय मोरे यांचे अनैतिक संबंध आहेत.या कारणावरून आकाश व अजय या दोघांमध्ये वाद झाले होते.
खुनापूर्वी आरोपींनी घरी येऊन केली विचारणा
आकाश भावसार याचा खून होण्यापूर्वी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अजय मोरे व इतर चार चार जण आकाशच्या घरी गेले होते. त्यानंतर पाचही जणांनी कालंका माता मंदिर परिसरात येत आकाशला घेरून धारदार शस्त्राने वार केले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेले दोन मित्र गल्लीत पळून गेले, तर आकाश हा रस्त्याच्या पलीकडे पळत गेला. त्याच्या डोके, छाती, पाठ, पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने घटनास्थळापासून जवळपास १०० फुटांपर्यंत रक्त सांडत गेले होते
दहा ठिकाणी वार
आकाश पळत दुसरीकडे जात असताना मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने छाती, पाठ व मांडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी दहा वार केले होते. त्यामुळे जबर जखमा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. चार दिवसांपूर्वी आकाशला मारेकऱ्यांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती आकाशच्या बहिणीने दिली.
आई मुलीकडे अन् इकडे मुलाचा खून
आकाशची आई घटनेच्या आदल्या दिवशीच वरणगाव येथे मुलीकडे गेली होती. त्यानंतर शनिवारी रात्री ही घटना घडली. कोकिळा भावसार यांचे बायपास झालेली असून, त्या अधूनमधून मुलीकडे, तर कथी भाचीकडे जात होत्या. त्याचा फायदा घेत अजय हा घरी यायचा, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.
चार जणांना अटक
आकाश भावसार या तरुणाच्या खूनप्रकरणी अजय मंगेश मोरे व तीन अल्पवयीन मुले असे एकूण चार जणांना रविवारी (४ मे) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. पाचव्या संशयिताचेही नाव निष्पन्न झाले आहे.