भोपाळ गॅस दुर्घटनेच्या नायकाला 'दहशतवादी' ठरवण्याची धमकी; अपमानाने ज्येष्ठ वकिलाने स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:53 IST2025-11-27T17:22:46+5:302025-11-27T17:53:42+5:30
मध्य प्रदेशात डिजिटल अरेस्टमध्ये अडकलेल्या एका वकिलाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

भोपाळ गॅस दुर्घटनेच्या नायकाला 'दहशतवादी' ठरवण्याची धमकी; अपमानाने ज्येष्ठ वकिलाने स्वतःला संपवले
Bhopal Digital Arrest Case: सायबर गुन्हेगारांनी दहशतवादी फंडिंगच्या खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिल्याने भोपाळमधील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ वकिलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवकुमार वर्मा असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ वकिलाचे नाव असून, जहांगीराबाद परिसरात सोमवारी रात्री ते त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी वर्मा यांचे कुटुंबिय घरी नव्हते. डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका वकिलाचा जीव गेल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे.
पोलिसांना घटनास्थळी शिवकुमार वर्मा यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट मिळाली आहे. या नोटमधून त्यांनी आत्महत्येमागील कारण आणि आपली व्यथा सांगितली. "मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. कारण, कोणीतरी माझ्या नावाचा वापर करून एका बनावट एचडीएफसी बँक खात्यातून पहलगाम येथील दहशतवादी आसिफला पैसे पुरवले. माझ्यावर देशद्रोही असल्याचा ठपका लागेल, हे मी सहन करू शकत नाही," असा उल्लेख वर्मा यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे. या धमक्यांमुळे आणि देशद्रोहाचा आरोप लागण्याच्या भीतीने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेच्या वेळी वर्मा यांची पत्नी आणि मुलगी दिल्लीत होत्या, तर मुलगा पुणे येथे नोकरी करतो. पत्नीने फोन केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांनी भाडेकरूला तपासणी करण्यास सांगितले. भाडेकरूने खिडकीतून पाहिले असता वर्मा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भोपाळ पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगाराने स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून वर्मा यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये त्वरित अटक करण्याची धमकी दिली होती. वर्मा यांना त्यांच्या नावावर उघडलेल्या बनावट बँक खात्यातून दहशतवादी फंडिंग झाल्याचे सांगून त्यांना देशद्रोही ठरवण्याची धमकी दिली. भोपाळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आला असून, तपास सुरू आहे. सुसाइड नोटमध्ये बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचा उल्लेख आहे. पोलिसांनी तातडीने सर्व तांत्रिक पुरावे गोळा करायला सुरुवात केली असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
शिवकुमार यांची समाजसेवेची पार्श्वभूमी
शिवकुमार वर्मा यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये त्यांच्या समाजकार्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी सांगितले की, १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेदरम्यान त्यांनी शेकडो पीडितांवर अंत्यसंस्कार केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. तसेच, त्यांनी सुमारे ५० वेळा रक्तदान करून अनेक लोकांचे जीव वाचवले होते. आयुष्यभर समाजसेवा केलेल्या व्यक्तीला अशाप्रकारे देशद्रोही ठरवण्याची धमकी मिळाल्याने त्यांना तो अपमान असह्य झाला.