जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:37 IST2025-11-21T18:36:33+5:302025-11-21T18:37:08+5:30
दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठ्या कारवाई करत ४८ तासांचं एक स्पेशल ऑपरेशन चालवलं, ज्याला CyHawk नाव देण्यात आलं.

जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठ्या कारवाई करत ४८ तासांचं एक स्पेशल ऑपरेशन चालवलं, ज्याला CyHawk नाव देण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि आसपासच्या भागात कार्यरत असलेल्या सायबर क्राईम मॉड्यूलचा खात्मा करणं हा कारवाईचा उद्देश होता. २१ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या संख्येने गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर याबाबत माहिती समोर आली आहे.
जॉइंट पोलीस कमिश्नर (इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) रजनीश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ही कारवाई ४८ तास चालली. या काळात दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि संशयित ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात समन्वित सायबर-अँटी फ्रॉड ड्राइव्ह होता.
शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, पोलिसांनी एकूण ८७७ लोकांना अटक केली. पीटीआयच्या मते, या आकडेवारीवरून सायबर गुन्हे एका मोठ्या नेटवर्कमध्ये कसे पसरले आहेत हे स्पष्ट होतं. या सर्व व्यक्ती विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीत सहभागी असल्याचा संशय आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी ५०९ व्यक्तींना नोटिसा देखील पाठवल्या. सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमधील तांत्रिक किंवा आर्थिक तपासात सहभागी असलेल्या संशयितांना या नोटिसा बजावण्यात आल्या.
CyHawk ऑपरेशनचा फोकस हा दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांची ऑनलाइन फसवणूक करणारं सायबर मॉड्यूलवर होता. डेटा, कॉल रेकॉर्ड, बँक ट्रान्झेक्शन आणि डिजिटल फूटप्रिंट्स वापरून अनेक गँगचा शोध घेण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नोकरीची फसवणूक करणारी गँग बनावट नोकरी वेबसाइट आणि सोशल मीडिया जाहिरातींद्वारे लोकांना टार्गेट करत होती. प्रक्रिया शुल्क, नोंदणी शुल्क किंवा मुलाखत शुल्काच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असत.
गुंतवणूक फसवणुकीच्या प्रकरणांच्या तपासात असं दिसून आलं की, अनेक मॉड्यूल लोकांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून स्कॅम करत होते. हे फसवणूक करणारे ऑनलाइन ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी आणि फॉरेक्सच्या नावाखाली पैसे उकळत होते. पोलिसांनी अशा अनेक नेटवर्क्समधून डिजिटल डेटा जप्त केला आहे. वर्क फ्रॉम होमच्या नावाने देखील लोकांना गंडा घातला.
दिल्ली पोलिसांनी या कारवाईदरम्यान अनेक बनावट कॉल सेंटरवरही छापे टाकले, ज्यात परदेशातील व्यक्तींना फसवण्यासाठी केलेले कॉल समाविष्ट होते. या कॉल सेंटरमधून जप्त केलेले संगणक, सर्व्हर आणि मोबाइल आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.