कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:50 IST2025-11-26T12:47:45+5:302025-11-26T12:50:29+5:30
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीचे मालक असलेल्या कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.

कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
प्रसिद्ध कमला पसंद आणि राजश्री पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. दीप्ती चौरसिया (वय ४०) असे त्यांच्या सुनेचे नाव असून, दिल्लीतील वसंत बिहार परिसरात ही घटना घडली. मंगळवारी सायंकाळी दीप्ती यांचा मृतदेह ओढणीला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती यांचा पती हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत वाद सुरू होता. त्यांच्या कुटुंबीयांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ओढणीने घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती चौरसिया यांनी ओढणीने गळफास घेतला. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली. सुसाईड नोटमध्ये कुणाची नावे आहेत आणि काय काय म्हटले आहे, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
दीप्ती आणि हरप्रीत यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आहे. सूत्रांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये प्रेम आणि विश्वासघात याबद्दलचा उल्लेख आहे. जर नात्यांमध्ये प्रेम नाहीये, विश्वास नाहीये, तर त्या नात्यामध्ये राहण्यात आणि जगण्याला काय अर्थ आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे.
हरप्रीत यांनी दोन लग्न केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतातील असून, अभिनेत्री असल्याचे बोलले जात आहे. प्रथम दर्शनी दीप्ती यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पण, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली, याचा तपास पोलीस करत आहे.
गुटखा व्यवसाय ते कोट्यवधींचा उद्योग
प्रसिद्ध पान मसाला कंपनी कमला पसंद कंपनीचे मालक मूळचे कानपूरचे आहेत. कानपूरमधील फीलखाना परिसरात कमला कांत चौरसिया यांनी गुटखा व्यवसाय सुरू केला होता.
४०-४५ वर्षांपूर्वी ते पान मसाला विकायचे. त्याला त्यांनी हळूहळू मोठ्या व्यवसायात बदलले आणि आज त्यांच्या कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. १९८०-८५ मध्ये त्यांनी पान मसाला घरी बनवायला सुरूवात केली होती.