अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:29 IST2025-08-11T17:28:48+5:302025-08-11T17:29:31+5:30
एका सुनेने तिच्या वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भरथना भागात एका सुनेने तिच्या वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. भरथना परिसरातील मोतीगंज परिसरात ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा रडत आहे आणि आपल्या आजीला मारहाण करू नकोस आणि तिला सोडून दे अशी विनंती करत आहे, जे अत्यंत हृदयद्रावक आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस सक्रिय झाले आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नात्याला काळीमा फासणारा हा धक्कादायक व्हिडीओ समोर येण्यापूर्वी सुनेने तिच्या सासूविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी क्रूरता आणि निष्पाप मुलाचं ओरडणं लोकांना हादरवून टाकणारं आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
पोलीस अधीक्षक श्रीशचंद्र यांनी सांगितलं की, भरथना पोलीस ठाण्याशी संबंधित एक व्हिडीओ मिळाला आहे, ज्याची दखल घेण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या वृद्ध सासूला मारहाण करत आहे. या संदर्भात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुनेकडून यापूर्वी नोंदवलेल्या तक्रारीतील तथ्ये देखील तपासली जात आहेत.
इटावा पोलिसांचं म्हणणं आहे की, जे काही पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक सून तिच्या वृद्ध सासूला कशी निर्दयपणे मारहाण करत आहे आणि एक निष्पाप मुलगा आपल्या आजीला वाचवण्यासाठी विनवणी करत आहे हे दिसून येते. या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. लोकांनी संताप व्यक्त केला आहे.