विदेशी नोकरीच्या बहाण्याने गंडा, वाशी व नेरुळमधील कंपन्यांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:16 AM2019-08-11T02:16:44+5:302019-08-11T02:16:57+5:30

विदेशात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Crimes against companies in Gandha, Vashi and Nerul by extortion of foreign employment | विदेशी नोकरीच्या बहाण्याने गंडा, वाशी व नेरुळमधील कंपन्यांविरोधात गुन्हा

विदेशी नोकरीच्या बहाण्याने गंडा, वाशी व नेरुळमधील कंपन्यांविरोधात गुन्हा

Next

नवी मुंबई - विदेशात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशी व नेरुळ पोलीस ठाण्यात संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पेन येथे मर्चंट नेव्हीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून १८ हून अधिक तरुणांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात व्हेव शिपिंग कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी सेक्टर २ येथील सी टाइप इमारतीमध्ये हे कार्यालय चालवले जात होते. फसवणूक झालेल्या तरुणांकडून नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी ७० हजार रुपये ते दीड लाख रुपये पर्यंतचे कमिशन घेण्यात आले होते. या वेळी त्यांना स्पेनमधील अडमोर चिनुक या जहाजावर नोकरीला लावण्याचे आश्वासन देण्यात
आले होते. त्याकरिता सीबीडी
येथील बी.पी. मरिन अ‍ॅकॅडमीमध्ये वैद्यकीय चाचणी करून घेण्यात आली होती. व्हेव शिपिंग कंपनीकडून फेसबुकवर केलेल्या जाहिरातीला भुलून या तरुणांनी नोकरीसाठी पैसे भरले होते. या वेळी त्यांना स्पेनमध्ये महिना ४०० अमेरिकन डॉलर पगाराच्या नोकरीची हमी देण्यात आली होती. त्याकरिता रणवीर सिंग, दीपक कुमार रेड्डी व हिम्मत सिंग तसेच इतर व्यक्तींनी त्यांच्याकडून कमिशन स्वरूपात रक्कम घेतली होती. यानंतर त्यांच्याकडून व्हिजासाठी पासपोर्ट जमा करून २९ जुलैला त्यांचे रशियाला जाण्यासाठी विमान असल्याचे कळवण्यात आले होते. तर त्याच दिवशी सकाळी वाशीतील कार्यालयातून पासपोर्ट व व्हिजा घेण्याचेही सांगण्यात आले होते.
प्रत्यक्षात मात्र त्या वेळी सर्वजण तिथे गेले असता, कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. तर संबंधितांचे फोनही बंद असल्याचे आढळून आले, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी गुन्हे शाखेकडे या संबंधी तक्रार केली होती, त्यानुसार चौकशीअंती वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रशियाला पाठवून फसवणूक

पनवेलमध्ये राहणाऱ्या शशांक मोहिते याने नेरुळमधील एड्युटाइम्स कन्सल्टन्सी या कंपनीमार्फत रशियातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले होते. या वेळी कंपनीच्या वतीने सिलीया डिसोझा, नुर शेख व निखिल दात्यातल यांनी नोकरीचे आश्वासन दिले होते. त्याकरिता कमिशन स्वरूपात ३.५० लाखांची मागणी केली होती. हे पैसे दिल्यानंतर त्यांनी शशांक यांना रशियातील एका हॉटेलमध्ये ४५ ते ६० हजार रुपये महिना पगारावर नोकरीसाठी पाठवले. मात्र, तिथे गेल्यावर शिकावू म्हणून बिनपगारी कामावर ठेवण्यात आल्याचे समोर आले.

त्यामुळे पगारावर नोकरीसाठी पाठवले असतानाही, बिनपगारी काम करावे लागत असल्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वेळी तिथल्या कासी विश्वनाथन या व्यक्तीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे संधी साधून त्यांनी भारतीय दूतावास कार्यालयात संपर्क साधून जानेवारी महिन्यात स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर भारतात आल्यापासून त्यांनी संबंधितांकडे नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागितले असता, टाळाटाळ होऊ लागल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्याद्वारे नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crimes against companies in Gandha, Vashi and Nerul by extortion of foreign employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.