एटीएममधील अकरा लाखांची रक्कम जळून खाक; ३५ लाख रुपये सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 20:32 IST2021-11-29T20:28:59+5:302021-11-29T20:32:16+5:30
Fire Caught to ATM : फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला.

एटीएममधील अकरा लाखांची रक्कम जळून खाक; ३५ लाख रुपये सुरक्षित
फैजपूर जि.जळगाव : चोरट्यांनी स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. यात गॅस कटरच्या ज्वालांमुळे एटीएममधील ११ लाखांची रक्कम जळून खाक झाली. तर ३५ लाखांची रक्कम ही सुरक्षित राहिली आहे.
फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. गॅस कटरच्या ज्वालांनी एटीएम जळाले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. या एटीएममध्ये ४५ लाख ८४ हजाराची रोकड होती व ती सुरक्षित आहे का? की आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, याबद्दल संभ्रम होता.
जळालेले एटीएम बँकेच्या अधिकृत ब्रेकरच्या सहाय्याने सोमवारी उघडण्यात आले. त्यावेळी एटीएममधील ३५ लाखांची रक्कम सुरक्षित असल्याचे आढळून आले. त्यापैकी दोन लाखांच्या रक्कमेला आस लागलेली होती तर दहा लाख ८४ हजाराच्या नोटा या जळालेल्या स्थितीत आढळून आल्या.
या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. या घटनेबाबत काही धागादोरा हाती लागतो का ? याची माहिती घेतली जात आहे. काही ठिकाणी पोलिस पथके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती तपासधिकारी सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर व फौजदार मोहन लोखंडे यांनी दिली.