भयंकर! कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:59 IST2021-03-14T14:57:35+5:302021-03-14T14:59:35+5:30
Crime News : फरजानाबी शेख जाबीर या भाजल्या गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भयंकर! कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी
जळगाव - कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता दूध फेडरेशनच्या पाठीमागे असलेल्या राजमालती नगरात घडली. या घटनेत फरजानाबी शेख जाबीर (वय ४२) या भाजल्या गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजमालतीनगरातील प्लॉट नं. ७ येथे पती जाबीर शेख, मुलगा अश्पाक व शोएब अशांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुलं व पतीसाठी नाष्टा व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीरशेख अंघोळीला गेले. बाथरुम मध्येच बादलीत हिटर लावुन पाणी तापवण्यात आले होते.
बादलीतील पाणी उकळायला लागल्यावर पती जाबीर याने उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. त्यात भाजल्या गेल्याने त्या किंचाळत धावत सुटल्या दोन्ही मुलांनी मदतीला धाव घेतली. यावेळी जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावई गुलाब शेख व मुलांनी जखमी फरजाना यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले असून तपास हवालदार रईस शेख करीत आहेत.