Kallu Kushwaha : खळबळजनक! भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:43 IST2026-03-31T12:42:02+5:302026-03-31T12:43:37+5:30
Kallu Kushwaha : भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची मंगळवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Kallu Kushwaha : खळबळजनक! भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची मंगळवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सेवढा चुंगी चौकात सकाळी ८:३० च्या सुमारास वॉर्ड क्रमांक १ च्या नगरसेवकावर हा जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे सकाळी चौकात उभे होते. त्याच वेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. गोळ्या लागताच कुशवाहा जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच दतिया कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासानुसार, ही हत्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नगरसेवक कल्लू कुशवाहा यांच्यावरही यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुमारे चार महिन्यांपूर्वीच ते जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले होते.
पोलीस त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि जुन्या वादांचा बारकाईने तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या मुख्य भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.