एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 23:18 IST2025-07-07T23:13:18+5:302025-07-07T23:18:52+5:30
बिहारमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आलं.

एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
Bihar Crime: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पाच जणांना जाळून मारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना मारहाण करून, नंतर जिवंत जाळण्यात आलं. तेटगामा गावात हा सगळा प्रकार घडला. गावातील रहिवासी रामदेव ओरांव यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी भूतबाधा आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाची प्रकृतीही खालावली होती. त्यांच्या मृत्यूचे कारण चेटकीण असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. याच संशयातून गावकऱ्यांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना संपवलं.
गावकऱ्यांनी चेटकीण असल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये बाबूलाल ओरांव, सीता देवी, मनजीत ओरांव, राणी देवी आणि काकतो यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी घरं सोडली आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली आणि ज्या भागात ही घटना घडली तो पूर्णपणे आदिवासी भाग आहे.
"हे प्रकरण भूतबाधा आणि काळ्या जादूशी संबंधित असून या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी जवळच्या तलावातून चार मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यांना मारहाण करून जाळण्यात आले की जाळून मारण्यात आले हे सांगणे कठीण आहे, असं पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाला मारहाण करून जिवंत जाळण्यात आले, आम्ही कसेबसे जीव वाचवत तिथून पळून गेलो, त्यांना जाळल्यानंतर पाण्यात फेकण्यात आले, असं मृताच्या कुटुंबातील ललितने सांगितले.
या घटनेत जर कोणी वाचले तर ते कुटुंबातील सोनू कुमार नावाचा मुलगा होता. तो भीतीने पळून गेला. त्याने पहाटे ५ वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबियांच्या हत्येमध्ये संपूर्ण गावाचा सहभाग होता. मुलाने चार मुख्य आरोपींची नावे सांगितली असून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. दोघांच्या चौकशीदरम्यान, पोलीस मृतदेह लपवलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर, गावकऱ्यांच्या मदतीने पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
लोक म्हणतात की गावातील काही लोकांना बाबूलाल ओरांव यांची पत्नी सीता देवी ही चेटकीण असल्याचा संशय होता. या संशयावरून गेल्या काही वर्षांपासून लोक सीता देवींना चेटकीण म्हणत त्रास देत होते. गेल्या काही महिन्यांत या गावात चार-पाच मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांना असा संशय आला की सीता देवी यांनी सर्वांना मारले. रविवारी संध्याकाळीही सीता देवी आणि गावातील काही लोकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या वादात संपूर्ण कुटुंबाला संपवण्यात आलं.