ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली अवैध जुगार आणि परकीय चलन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 'विंझो' आणि 'झो' या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या बेंगळुरू विभागीय कार्यालयाने या कंपन्यांची तब्बल ५९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये बँक खाती, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि बॉण्ड्सचा समावेश आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
परदेशात गुंतवणुकीचे थोतांड, नियंत्रण भारतातातून!
तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, विंझोने विदेशी शेल कंपन्यांमध्ये ४९२ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा बनाव रचला होता. अमेरिका आणि सिंगापूर येथे या कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात होत्या. प्रत्यक्षात या कंपन्यांचे कोणतेही स्वतंत्र कार्यालय किंवा कर्मचारी परदेशात नव्हते. या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार भारतातूनच हाताळले जात होते. या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेत लुडो, बिंगो आणि ब्लॅकजॅक सारखे बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालवले जात होते.
अवैध कमाईवर ईडीची टाच
विंझो कंपनीचे भारतात सुमारे २५ कोटी युजर्स असल्याचा दावा केला जातो. मात्र, परदेशात गुंतवणुकीच्या नावाखाली पैसा बाहेर पाठवून तिथे अवैध जुगाराचा व्यवसाय सुरू ठेवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. हा सर्व व्यवहार 'फेमा' कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याने ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.
गुरुग्राममध्येही 'ईडी'चा दणका; ८२ कोटींची मालमत्ता जप्त
दुसरीकडे, ईडीच्या गुरुग्राम कार्यालयानेही एका मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात कारवाईचा बडगा उगारला आहे. सेक्टर-८३ मधील 'अंसल हब-८३' या कमर्शियल प्रोजेक्टशी संबंधित ८२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंसल हाउसिंग लिमिटेडच्या प्रवर्तकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप असून, हरियाणा पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू आहे. या प्रकल्पामध्ये १४७ दुकाने आणि १३७ कार्यालयांचा समावेश आहे. एकाच वेळी गेमिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील या मोठ्या कारवायांनी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.