स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:36 IST2025-11-19T18:35:15+5:302025-11-19T18:36:15+5:30
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

फोटो - zeenews
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली. काही गुन्हेगारांनी एचडीएफसी बँकेच्या एटीएम करन्सी भरणाऱ्या व्हॅनमधून तब्बल ७.११ कोटी रुपये लुटले आणि व्हॅनमधील कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं. सीएमएस कॅश व्हॅन जेपी नगर शाखेतून रोख रक्कम घेऊन जात असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा इनोव्हामध्ये बसलेल्या गुन्हेगारांनी व्हॅन अडवली आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं की ते कर विभागातील अधिकारी आहेत आणि त्यांना कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. कर्मचारी काही बोलण्याआधीच गुन्हेगारांनी त्यांच्यासह रोख रक्कम जबरदस्तीने त्यांच्या इनोव्हामध्ये भरली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना रस्त्यातच खाली उतवण्यात आलं आणि ते ७.११ कोटी रुपये घेऊन डेअरी सर्कलकडे पळून गेले.
दक्षिण विभाग पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. प्राथमिक तपासात एका संघटित गँगचा यामध्ये सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार बन्नेरघट्टा रोडने पळून गेले.
दक्षिण विभाग पोलिसांनी शहरात अनेक चौक्या उभारल्या आहेत आणि राखाडी रंगाच्या इनोव्हा कारवर नजर ठेवली जात आहे. जयनगर, डेअरी सर्कल आणि बन्नेरघट्टा रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करता येणार नाही, असं दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त लोकेश जगलासुर यांनी म्हटलं आहे.