प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:45 IST2025-07-01T12:44:23+5:302025-07-01T12:45:37+5:30
मृत तरुणीच्या कुटुंबाने, मुलीच्या प्रियकरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला त्यांनीच मारले असा आरोप, या मुलीच्या कुटुंबाने केला आहे.

प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
प्रेमप्रकरणातून हत्या होण्याची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. आता बिहारच्या बेगूसरायमधून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागातील एका बंद घरात तरुणीचा मृतदेह आढळला असून, ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. इतकंच नाही तर, या तरुणीच्या हातापायांवर जागोजागी कापल्याच्या खुणा होत्या. मात्र, या तरुणीचा मृत्यू कसा झाला, हे एक मोठं गूढं बनलं आहे.
या मृत तरुणीच्या कुटुंबाने, मुलीच्या प्रियकरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला त्यांनीच मारले असा आरोप, या मुलीच्या कुटुंबाने केला आहे. या मुलीचे गावातच राहणाऱ्या एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले होते. याच मुलाच्या सांगण्यावरून मुलीने आपले घर सोडून त्याच्या घरी जाण्याची तयारी केली होती. मात्र, मुलाच्या कुटुंबीयांनी तिला घरात येऊ दिले नाही. त्यांनी तिला एका नातेवाईकाच्या घरी पाठवले. मात्र, यानंतर तरुणीचा मृतदेह सापडला.
प्रियकराने बोलावले म्हणून गेली...
बलिया ठाणे क्षेत्रातील जाफर नगर सनहा गावात ही घटना घडली आहे. या मृत तरुणीचे नाव हिना कुमारी असून, ती अवघी २० वर्षांची होती. हिनाचे लग्न देखील झाले होते. मात्र, प्रियकराच्या सांगण्यावरून तिने आपल्या पतीला सोडून दिले होते. प्रियकराने घरी बोलवताच हिना त्याच्या घरी गेली. मात्र, त्याच्या कुटुंबाने तिला घरात घेण्यास नकार दिला आणि तिला एक नातेवाईकांच्या घरी पाठवून दिले.
या घटनेबाबत मृत तरुणीचा भाऊ छोटू कुमारने आरोप केला आहे की, त्याच्या बहिणीचे लग्न एक वर्षापूर्वी कुटुंबाच्या संमतीने झाले होते. परंतु, तिने सहा महिन्यांपूर्वी तिने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीसोबतचे संबंध तोडले होते. यानंतर, हिनाचे पालक गाव सोडून पटना येथे राहायला गेले आणि हिना देखील तिच्या पालकांसह पटना येथे राहू लागली. परंतु, तिचे प्रेमसंबंध गावातील तिच्या प्रियकरासोबत सुरूच राहिले.
बंद घरात फासावर लटकलेला मृतदेह आढळला
हिनाच्या भावाने सांगितले की, तिचा प्रियकर बाहेर काम करतो. त्यानेच आपल्या बहिणीला फोन करून घरी येण्यास सांगितले. म्हणून हिनाने तिच्या प्रियकराचे म्हणणे मान्य केले आणि ती पाटण्याहून पळून त्याच्या घरी पोहोचली. पण हिनाच्या प्रियकराच्या कुटुंबाने तिला त्यांच्या घरी राहू दिले नाही आणि तिला तिच्या नातेवाईकांच्या घरी पाठवले. यानंतर, हिनाचा मृतदेह त्यांच्या गावातील एका जुन्या बंद घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
हिनाचा मृत्यू गूढ बनला!
हिनाचा भाऊ छोटू कुमार याने आरोप केला आहे की, कोणीतरी त्याच्या बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह फासावर लटकवला. हिनाच्या हातावर आणि पायावर जखमांच्या खुणा आहेत. आता पोलिसांनी हिनाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हिनाच्या गूढ मृत्यूमागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.