शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 05:25 PM2021-01-20T17:25:13+5:302021-01-20T17:26:22+5:30

CBI taken Action : ट्रॅक्टरचे कर्ज थकविल्याचे प्रकरण : एक दिवस कोठडी

Bank official caught taking bribe from farmer by CBI | शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देट्रॅक्टर जप्तीची भीती दाखवून सुभाष काशिनाथ राणे (६८,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेणारा बँकेचा वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे (वय ४२ रा. औरंगाबाद) याला पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली होती.

जळगाव : बँक ऑफ बडोदाकडून ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने ट्रॅक्टर जप्तीची भीती दाखवून सुभाष काशिनाथ राणे (६८,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेणारा बँकेचा वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे (वय ४२ रा. औरंगाबाद) याला पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली होती. दरम्यान, बुधवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे येथील शेतकरी सुभाष काशिनाथ राणे यांनी सन २०१०-११  मध्ये चाळीसगाव येथील देना बॅकेच्या शाखेकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी ५  लाख रुपये कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी कर्जाचा एकही हप्ताभरला नाही. त्यामुळे बँकेचे थकबाकीदार झाले. विशेष म्हणजे बँकेकडून दरम्यानच्या काळात थकबाकीची मागणीही राणे यांच्याकडून करण्यात आली. यानंतर ही बँक ऑफ बडोदा या बँकेत वर्ग झाली. या कर्जाबाबत दहा वर्षानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३०  वाजता बँक ऑफ बडोदा मध्ये कार्यरत वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे हा राणे यांच्याकडे आले. त्यांनी बॅक ऑफ बडोदाची कर्ज थकल्याबाबची नोटीस दाखविली. राणे यांनी घेतलेल्या ५ लाखांचे कर्ज आता १३  लाख रुपये झाले असल्याचे सांगत थकबाकी भरली नाही तर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल असे सांगितले. यावेळी राणे यांनी ट्रॅक्टर जप्त न करण्याची विनंती साबळे यांच्याकडे केली, तेव्हा राणे यांनी विनंती केल्यावर त्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी शेतकरी राणे यांनी नाईलाजाने साबळे यास दहा हजार रुपये दिले.

पुन्हा आला अन‌् जाळ्यात अडकला
शेतकरी राणे यांनी दहा हजार रुपये दिल्यानंतर १२  जानेवारी रोजी वसुली अधिकारी प्रशांत साबळे हा पुन्हा राणे यांच्याकडे आला. यावेळी त्याने ठरलेल्या रकमेपैकी उर्वरीत १०  हजार रुपयांची मागणी केली तसेच कर्जाच्या हप्त्याचे २ लाख रुपये राणे यांना भरावयास सांगितले. तसेच बँकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने १२ लाखांचे कर्ज ५ लाख ४०  रुपयापर्यत कमी करुन देईन असे सांगून त्यासाठी ठरलेल्या रकमेच्या अतिरिक्त आणखी २०  हजार रुपयांची मागणी राणे यांच्याकडे केली. वसुली अधिकारी यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याने शेतकरी सुभाष राणे यांनी १२ जानेवारी रोजी प्रशांत साबळे याच्याविरोधात पुणे येथील सीबीआय अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

आठ दिवस ठोकले तळ
या तक्रारीनंतर पुणे येथील सीबीआय एसीबीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी राणे यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच राणे व साबळे यांच्या संभाषणात केलेल्या तक्रारीनुसार तथ्य पथकाला आढळून आले. यासाठी पुणे सीबीआयचे पथक गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून होते. पडताळणी झाल्यानंतर महेश चव्हाण यांच्यासह पथकाने १९ जानेवारी रोजी सापळा रचून चाळीसगाव शहरातून वसुली अधिकारी प्रशांत साबळे यास राणे यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाळ ताब्यात घेतले. यानंतर याप्रकरणी पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून साबळे यास अटक करण्यात आली. बुधवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. आर.जे.कटारिया यांनी एक दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान संशयित साबळे यास शहरातील एका पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Web Title: Bank official caught taking bribe from farmer by CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.