वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:09 IST2025-10-02T11:08:17+5:302025-10-02T11:09:00+5:30
एका तरुणाने मित्राच्या मदतीने मालमत्ता आणि पैशांसाठी आपल्याच वडिलांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका तरुणाने मित्राच्या मदतीने मालमत्ता आणि पैशांसाठी आपल्याच वडिलांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली. त्यांचा मृतदेह शेतात आढळला. वडील पाचवं लग्न करणार होते आणि त्यांची मौल्यवान मालमत्ता त्यांच्या नवीन पत्नीच्या नावावर करू इच्छित होते, म्हणूनच मुलाने त्यांची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलासह दोघांना अटक केली आहे.
मन्सूर खानची २७ सप्टेंबरच्या रात्री नरैनी पोलीस स्टेशन हद्दीतील हडहा गावात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शेतातील एका घरात आढळला, त्यानंतर मुलाने पोलिसांना माहिती दिली आणि तक्रार दाखल केली. शवविच्छेदन आणि तीन पथकांच्या तपासात एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांनी मुलगा मसूक खान याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं की, त्याच्या आजोबांनी काही जमीन वडिलांच्या नावावर केली होती, परंतु त्याच्या वडिलांनी लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी ४४ लाख रुपये खर्च केले होते, त्याला फक्त ५ लाख दिले. वडील मुलाच्या नावावर जमीन करतो असं म्हणाले होते परंतू त्यांनी तसं केलं नाही.
वडील पाचव्यांदा लग्न करणार होते आणि त्यांची सर्व मालमत्ता नव्या बायकोच्या नावावर करणार होते. म्हणूनच मुलाने संधी साधून वडिलांवर दोन गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता दोन जणांना अटक केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.