बहिणीशी झालं भांडण; रागाच्या भरात महिलेने ९ महिन्यांच्या मुलाला छतावरून फेकलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:51 IST2025-01-26T10:50:58+5:302025-01-26T10:51:48+5:30
एका २७ वर्षीय महिलेने तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाला छतावरून फेकून दिलं.

बहिणीशी झालं भांडण; रागाच्या भरात महिलेने ९ महिन्यांच्या मुलाला छतावरून फेकलं अन्...
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय महिलेने तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाला छतावरून फेकून दिलं, ज्यामध्ये बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि तिची चौकशी सुरू केली आहे.
एजन्सीनुसार, ही घटना शनिवारी कृष्णा नगर परिसरात घडली. आरोपी महिला अंजू देवी ही तिची बहीण मनीषा हिच्यासोबत तिच्या माहेरी राहत होती. शनिवारी दोन्ही बहिणींमध्ये कशावरून तरी वाद झाला.
रागाच्या भरात अंजूने तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून फेकून दिलं. यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू देवीचा प्रेमविवाह झाला होता. ती गेल्या दोन वर्षांपासून तिच्या पालकांच्या घरी राहत होती. अंजूची मोठी बहीण मनीषा देखील गेल्या दोन महिन्यांपासून त्याच घरात राहत होती. बलियाचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपी अंजू देवी हिला ताब्यात घेतलं.
मुलाची आजी शोभा देवी यांच्या तक्रारीवरून, अंजूविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपी महिलेची चौकशी करत आहेत. मात्र या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.