दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:44 IST2025-09-30T14:44:14+5:302025-09-30T14:44:56+5:30
सुनेच्या सवयीमुळे सासू रेखा नाराज झाली. कालांतराने तिचा राग इतका वाढला की, रेखाने एक भयंकर प्लॅन केला.

दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधुनिक विचारसरणीची आणि फिटनेसवर प्रेम करणारी सून पूजा दररोज जिमला जायची. मात्र जिमला जाताना ती कानातले, अंगठ्या, चेन आणि इतर दागिने घालत असे. सुनेच्या या सवयीमुळे तिची सासू रेखा नाराज झाली. कालांतराने तिचा राग इतका वाढला की, रेखाने एक भयंकर प्लॅन केला.
सासुला वाटलं की, तिच्या सुनेमध्ये दिखाऊपणा, अहंकार आणि ढोंगीपणा आहे. रेखाने सुनेला चांगलाच धडा शिकवण्यासाठी गुन्हेगार अंकुर उर्फ काशीशी संपर्क साधला आणि तिच्या सुनेचे दागिने चोरण्याचे काम त्याला दिलं. अंकुरने या प्लॅनमध्ये त्याचे दोन साथीदार वंश आणि वीर सिंह यांना सामील केलं. एसएसपी मुझफ्फरनगर संजीव कुमार वर्मा यांनी सांगितलं की, सुरुवातीला पूजा नावाच्या महिलेने घटना घडल्याची माहिती मिळाली.
तपासात असं दिसून आलं की, ही केस सासू आणि सुनेमधील वादाशी संबंधित आहे. सासूने तिच्या सुनेचं लोकेशन तिच्या ओळखीच्या एका गुन्हेगाराला दिलं आणि त्याला गुन्हा घडवण्याच्या सूचना दिल्या. पूजा जिमला जात असताना सासून तिचं लोकेशन अंकूरला पाठवलं. त्यानंतर गुन्हेगारांनी तिला गाठलं आणि पुजाचे कानातले, अंगठ्या, चेन आणि इतर दागिने हिसकावले.
घटनेची माहिती मिळताच पुरकाजी महिला पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. १२ तासांच्या आत, वंश, अंकुर आणि वीर सिंह या तिघांना अटक करण्यात आली आणि चोरीचे दागिने जप्त करण्यात आले. सासूनेच सुनेला अद्दल घडवण्यासाठी हा धक्कादायक कट रचला होता. या घटनेने पोलीसही हैराण झाले. जेव्हा या घटनेमागचं सत्य सर्वांसमोर आलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.