बदलापूर शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या खुन्याला पाच वर्षांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 21:52 IST2021-10-14T21:51:45+5:302021-10-14T21:52:19+5:30
Crime News : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: कोल्हापुरातून घेतले ताब्यात

बदलापूर शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या खुन्याला पाच वर्षांनी अटक
ठाणे: बदलापूर पूर्व, शिवाजी चौक येथील शिवसेनेचे उप शाखाप्रमुख केशव मोहिते यांचा खून करून पसार झालेल्या सागर कांबळे (३७, रा. कोल्हापूर) या फरारी आरोपीला कोल्हापूर येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्याला बदलापूरपोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोहिते यांचा पूर्ववैमनस्यातून ४ एप्रिल २०१५ रोजी खून झाला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये चार आरोपींना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोप दाखल झाले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या गुन्ह्यात सागर हा पाच वर्षांपासून पसार होता. तो कोल्हापुरातील उंचगाव येथे वास्तव्याला असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस नाईक दादासाहेब पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांच्या पथकाने सागर याला १२ ऑक्टोबर रोजी अटक केली.