भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:31 IST2021-10-18T15:30:31+5:302021-10-18T15:31:54+5:30
Accident Case : दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी
नितीन भावे
खाेपाेली : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला, तर दाेनजण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात आज सकाळी पावने सहाच्या सुमारास झाला. जखमींवीर खाेपाेली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पो ला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर भाजी वाहून नेणारा टेम्पो हा कारवर जोरदार धडकला. त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो हा पुन्हा ट्रेलरला आणि दाेन बसलाही धडकला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार मधील मृत व्यक्तींच्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एक्सप्रेस वेवर किलाेमिटर 39 येथे रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या संस्थेचे सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाजूला काढले त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
किलोमीटर ३९ जवळ सातत्याने अपहात हाेत आहेत. अपघातांची संख्या पाहता त्याला आळा बसावा म्हणून या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक लेन ३ किलोमीटर बंद करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात pic.twitter.com/TQ1JcvXQSV
— Lokmat (@MiLOKMAT) October 18, 2021