कर्नाटकच्या कोर्टात हत्येचा प्रयत्न; जमिनीच्या वादातून पुण्यातल्या महिलेवर शस्त्राने प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:36 IST2025-11-19T14:10:20+5:302025-11-19T14:36:57+5:30
कर्नाटकातील कोर्टात पुण्यातील महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्नाटकच्या कोर्टात हत्येचा प्रयत्न; जमिनीच्या वादातून पुण्यातल्या महिलेवर शस्त्राने प्राणघातक हल्ला
Karnatak Crime:कर्नाटकातील बेगळावात एका कोर्टात महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या कायदेशीर दाव्याच्या सुनावणीसाठी कोर्टात आलेल्या एका महिलेसोबत हा प्रकार घडला. अथणी येथील न्यायालयात आवारात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. हल्लेखोराने महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून थेट हत्येचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पुण्यातील मूळच्या मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर अथणी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भर कोर्टात कोयत्याने हल्ला
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मीनाक्षी शिंदे या कोर्टाच्या कामकाजासाठी कोर्टात येत होत्या. याच वेळी आरोपी बाळासाहेब चव्हाण हा त्यांच्या पाठीमागून आला. कोणतीही पूर्वसूचना न देता, त्याने मीनाक्षी यांच्यावर कोयत्याने एकाएकी जोरदार वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने कोर्ट परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोतंगट्टी गावातील जमिनीचा वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला तालुक्यातील खोतनाट्टी गावातील जमिनीच्या वादातून झाला आहे. मीनाक्षी शिंदे आणि आरोपी बाळासाहेब चव्हाण यांच्यात याच जमिनीवरून कायदेशीर दावा सुरू होता.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बाळासाहेब चव्हाण याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. न्यायालयासारख्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी ही घटना घडल्यामुळे वकील आणि नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी कोर्ट परिसरात तातडीने पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.