९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:17 IST2025-09-16T12:16:46+5:302025-09-16T12:17:48+5:30
Nupur Bora : आसाम सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला. पथकाने ९० लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.

फोटो - ndtv.in
आसाममध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाने आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (ACS) अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला. याच दरम्यान पथकाने तब्बल ९० लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून नुपूर बोरावर लक्ष ठेवलं जात होतं. बोराने तिच्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे मोठी मालमत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, बोरा बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसर असताना, तिने संशयित घुसखोरांच्या नावावर सरकारी जमिनी बेकायदेशीरपणे नोंदवल्या होत्या.
दक्षता पथकाने बोराशी संबंधित लोकांच्या घरावरही छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. बाघबर महसूल सर्कलमधील लाट मंडळ सूरजित डेकाच्या बहुमजली घरावरही छापा टाकण्यात आला. डेकावर बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा आणि बारपेटामध्ये अनेक जमिनी खरेदी करण्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डेकाने नुपूर बोराशी संगनमत करून ही मालमत्ता मिळवली होती.
२०१९ मध्ये आसाम सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवड झालेली नुपूर बोरा हिने बारपेटा आणि कार्बी आंगलोंग जिल्ह्यात जबाबदार पदांवर काम केलं. बारपेटा येथे तिच्या नियुक्तीदरम्यान तिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. नंतर जेव्हा तिची कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी येथे बदली झाली, तेव्हा तेथेही भ्रष्टाचाराशी संबंधित नवीन तक्रारी समोर आल्या.