अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:16 IST2026-04-27T08:14:50+5:302026-04-27T08:16:07+5:30
पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे.

अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी
नाशिक - भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात रविवारी (दि. २६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याला लगेचच सातव्या गुन्ह्यात एसआयटीने ताब्यात घेतले. त्यामुळे या गुन्ह्याप्रकरणी खरातला सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. खरातचे रविवारी पोलिस कोठडीतले ४० दिवस पूर्ण झाले. १२ गुन्हे त्याच्यावर नाशिक शहरात दाखल आहेत. १४ वेळा त्याला या ४० दिवसांत न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. यापैकी फक्त चार वेळेसच त्याला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
प्रारंभी जे १२ गुन्हे नाशिमधील सरकारवाडा पाेलिस ठाण्यात खरातवर दाखल आहे त्या प्रकरणी सध्या सुनावणी होत आहे. नंतर खरातचा ताबा शिर्डी तसेच सिन्रर पोलिस घेतील. एकूण दहा वेळा सुरक्षेच्या कारणास्तव खरात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच न्यायालयासमोर हजर झाला असून प्रत्येक सुनावणीदरम्यान न्यायाधीश त्याला काही बोलायचे आहे का? असा सवाल करतात, मात्र तो फक्त मान हलवून नाही म्हणतो अन् कोर्टात चाललेला दोघा बाजूचा युक्तिवाद ऐकत बसतो. मात्र तो पूर्वीपेक्षा बराच खचलेला दिसून येत आहे. पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे.
खरात प्रकरणात सहभाग आढळणारे बडतर्फ होणार
भोंदू अशोक खरात प्रकरणात महसूल विभागातील ज्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. रविवारी शिर्डीत सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, अशोक खरात याने जमीन लाटणे किंवा खरेदी-विक्री केल्याच्या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे.
स्मृतिभ्रंशाचे नाटक
अत्याचार करण्यापूर्वी पीडितेला खरातकडून गुंगी येईल, असे पदार्थ दिले जात होते. आणि या औषधांचा पुरवठा त्याला कुठून व्हायचा, यावर खरात मौन बाळगून आहे. तो स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पीडित महिलेला तो जाळ्यात कसा ओढायचा यावरही खरातने काहीच खुलासा केलेला नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.