ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 05:58 IST2025-12-16T05:58:09+5:302025-12-16T05:58:25+5:30
श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते.

AI Generated Image
मुंबई : डिलिव्हरी ऑर्डरच्या वादातून धीरज चौहान (१९) या डिलिव्हरी बॉयवर चाकूहल्ला झाल्याची घटना चारकोपमध्ये घडली. यात त्याचा मित्रही जखमी झाला असून या प्रकरणी चारकोप पोलिसांनी श्रेयांश श्रेयस्कर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
धीरज कुटुंबासह कांदिवलीत राहत असून तो किसान कनेक्ट येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहे. तक्रारीनुसार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी डिलिव्हरीचे काम करत असताना, त्याच ठिकाणी काम करणाऱ्या श्रेयांश श्रेयस्कर याने स्वतःसाठी डिलिव्हरी ऑर्डर केली होती. ही ऑर्डर धीरज यांच्या आयडीवर आली होती. श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले. यावर धीरज याने ऑर्डर घ्यायची नसेल तर ती कॅन्सल करण्यास सांगितले.
मात्र ऑर्डर प्रलंबित राहिल्यामुळे धीरज यांचे डिलिव्हरी टार्गेट व इन्सेंटिव्हवर परिणाम होतो. त्यामुळे दोघांत वाद झाला. मात्र यानंतर कंपनी इन्चार्ज विवेक कांबळे यांनी श्रेयांशला समज दिली होती. परंतु दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबरच्या दुपारी ४ वाजता, धीरजने या विषयावर चर्चा करण्यासाठी श्रेयांशला किसान कनेक्ट कार्यालयाजवळ बोलावले. मात्र श्रेयांशने चाकूने धीरजवर हल्ला केला.
श्रेयांशवर गुन्हा दाखल
या हल्ल्यात धीरज याच्या डाव्या हाताच्या दंडावर, कंबरेच्या वर पोटाच्या डाव्या बाजूस जखमा झाल्या.धीरज याचा मित्र राज विश्वकर्मा याच्याही उजव्या खांद्यावर चाकूने वार करण्यात आला. याप्रकरणी तक्रारीनुसार चारकोप पोलिसांनी श्रेयांशवर गुन्हा दाखल केला आहे.